Software Developer Given Rs 2 Lakh Salary Hike And Fired Within A Month: मुलाखतीच्या सहा फेऱ्यानंतर, नोकरी मिळवलेल्या एका सॉफ्टवेअर डेव्हलपरने, अवघ्या एका महिन्यातच कंपनीतून काढून टाकल्यानंतर रेडिटवर त्याच्या कठीण परिस्थितीचा अनुभव सांगणारी पोस्ट शेअर केली आहे.
४.२ लाख रुपये वार्षिक पगारावरून ६.५ लाखांपर्यंत पगारवाढ मिळवलेल्या या सॉफ्टवेअर डेव्हलपरने सांगितले की, त्याला बॅकएंड डेव्हलपर म्हणून कामावर ठेवण्यात आले होते आणि सुरुवातीला त्याला वाटले की, तो करत असलेल्या कामाचा कंपनी उत्पादनात वापर करत असेल. पण, त्याच्या पहिल्या महिन्याच्या शेवटी, त्याच्या मॅनेजरने त्याला सांगितले की, “आम्ही तू लिहिलेला कोड वापरत नाही.” यानंतर पाच दिवसांनी, त्याला याबाबत स्पष्टीकरण न देता टर्मिनेशन लेटर देण्यात आले.
डॉकर, एडब्ल्यूएस, लिनक्स, पायथॉन, नोड.जेएस आणि गोलंगमध्ये दोन वर्षांचा अनुभव असलेल्या या डेव्हलपरने सांगितले की, कंपनीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे त्याला धक्का बसला. “नोकरी जाऊन १५ दिवस झाले आहेत. मी नवीन नोकरी शोधायलाही सुरुवात केलेली नाही. मला पूर्णपणे एकटे पडल्यासारखे वाटत आहे, जणू मला जे काही माहिती होते ते सर्व विसरलो आहे”, असे या डेव्हलपरने पोस्टमध्ये लिहिले आहे.
या सर्व गोंधळात, कंपनीने या डेव्हरपरला नोकरीवरून काढल्यानंतर लगेचच बॅकएंड डेव्हलपरची भरती पूर्णपणे थांबवल्याचे वृत्त आहे. “जर त्यांना खात्री नव्हती तर त्यांनी मला सुरुवातीला मला का नोकरी दिली, असा प्रश्न मला पडतो”, असे तो पुढे म्हणाला.
रेडिटवर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याला पाठिंबा दिला. याचबरोबर अनेक युजर्सनी त्यांना आलेले असे अनुभव शेअर केले. एका युजरने म्हटले की, “भाऊ, या शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी माझ्यासोबतही असेच घडले. मला २ वर्षांचा पूर्ण-स्टॅक अनुभव होता, परंतु मी नवीन असल्याने, कामाच्या प्रक्रियेची सवय व्हावी म्हणून मी माझी कामे पूर्ण करण्यासाठी थोडा वेळ घ्यायचो. अचानक मला एक महिन्याची नोटीस मिळाल्याचे फोन आला. मग अचानक, त्यांनी मला सांगितले की, आज माझा शेवटचा दिवस आहे, त्यांनी कामगिरी आणि कंपनीच्या आर्थिक समस्यांमुळे राजीनामा देण्यास आणि दुसऱ्या दिवशी लॅपटॉप परत करण्यास सांगितले.”
हा युजर पुढे म्हणाला की, “मी अजूनही धक्क्यात आहे. १.६ वर्षांच्या प्रयत्नांनंतर मी ही नोकरी मिळवली होती आणि आता ती पुन्हा गेली आहे. देवालाच माहीत आहे की मला पुढे कोण कामावर ठेवेल की नाही. ही एक स्टार्टअप कंपनी आहे.”