पश्चिम बंगालला सध्या अम्फान चक्रीवादळाचा फटका बसला आहे. याआधीच करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात बिकट परिस्थिती निर्माण झालेली असताना पश्चिम बंगाल, ओडीशा या राज्यांसमोरील अडचण वाढत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याचं घर कोलकाता शहरात आहे. मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळामुळे गांगुलीच्या घरातलं आंब्याच्या झाडाची फांदी तुटून घराच्या गॅलरीत आली.

गांगुली आणि त्याच्या घरातल्या सदस्यांनी एकत्र येत ही फांदी काढली. यादरम्यानचा फोटो गांगुलीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला.

हा फोटो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांना सौरव गांगुलीच्या लॉर्ड्समधील अवताराची आठवण झाली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नाव अभिमानाने घेतलं जाण्यात सौरव गांगुलीचा मोठा वाटा आहे. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली होती. २००२ साली इंग्लंडलच्या लॉर्ड्स मैदानावर Netwest ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर मात केल्यानंतर सौरव गांगुलीने जोशात येत आपला टी-शर्ट काढून सेलिब्रेशन केलं होतं.