मार्च महिन्यापासून संपूर्ण जग करोना विषाणूच्या विळख्यात आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी बहुतांश सर्व देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या काळामध्ये अनेक उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प झाल्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. भारतासह अनेक देशांमध्ये शैक्षणिक संस्थाही या काळात बंद होत्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरचं परीक्षेचं टेन्शन नव्हतं. परंतू या खडतर काळातही दक्षिण कोरिया देशाने करोनाचा प्रादूर्भाव होणार नाही याची काळजी घेत चक्क फुटबॉलच्या मैदानावर परीक्षेचं आयोजन केलं होतं.

सिओल भागातील Ansan फुटबॉल मैदानावर ही ४ एप्रिल रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. दीड तासाच्या पेपरसाठी यावेळी सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्यात आलं होतं. Ansan Urban Corporation या कंपनीने ही परीक्षा घेतली होती. ६ हजार ६०० स्केवर मीटर मैदानावर १३९ उमेदवारांसाठी खास सोय करण्यात आली होती. प्रत्येक उमेदवारामध्ये किमान ५ मीटरच अंतर होतं. तसेच परीक्षा देण्याआधी सर्व उमेदवारांचं थर्मल स्क्रिनींग करण्यात आलं आणि त्यांना पेपर देताना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं होतं.

KBS World Radio संकेतस्थळाशी कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी बातचीत केली. “आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेता नोकरभरतीसाठीची परीक्षा रद्द करु नये अस कंपनीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. अशा परिस्थितीमध्ये एक खासगी कंपनी सर्व नियमांचं पालन करुन परीक्षा घेऊ शकत असेल तर ते सर्व जगासाठी एक चांगलं उदाहरणं ठरेल असं आम्हाला वाटलं. म्हणूनच सर्व नियमांचं पालन करुन आम्ही ही परीक्षा घेतली.” दक्षिण कोरियात आतापर्यंत १० हजार पेक्षा जास्त लोकांना करोनाची लागण झालेली असून १८६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.