सुटीच्या दिवसात वॉटर पार्कमध्ये जाऊन घेतलेला अनुभव आपण कितीही मोठे झालो तरी विसरु शकत नाही. पाण्यात मनसोक्त खेळताना आपण जगच विसरुन जातो. अशा ठिकाणी मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाबरोबर केलेली धमाल मस्ती काही औरच. मात्र दिव्यांग मुले या आनंदापासून मुकतात. इतर मुलांप्रमाणे वॉटर पार्कचा किंवा इतर गोष्टींचा आनंद घेण्यात त्यांना अनेक मर्यादा येतात. मात्र या दिव्यांग मुलांनाही हा आनंद घेता यावा यासाठी अमेरिकेत एक स्पेशल वॉटर पार्क सुरु करण्यात आले आहे.

दिव्यांगांनाही उन्हाळ्याच्या दिवसात होणारी अंगाची लाही लाही कमी होऊन पाण्यात खेळण्याचा आनंद घेता यावा यासाठी टेक्सासमध्ये एक स्पेशल पार्क उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दिव्यांग मुलांसाठी मोफत प्रवेश देण्याचा निर्णय पार्कच्या संचालकांनी घेतला आहे. व्हीलचेअरवर असल्याने अनेक दिव्यांग मुले दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतात. त्यामुळे पाण्यात किंवा पार्कमध्ये खेळण्याचा आनंद मिळणे त्यांच्यासाठी दुरापास्तच. मात्र त्यांनाही अशाप्रकारे पाण्यात खेळण्याची संधी मिळाल्यास त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद शब्दांच्या पलिकडचाच.

या मुलांच्या मर्यादा लक्षात घेऊन टेक्सास येथे हे पार्क उभारण्यात आले आहे. त्यासाठी अनेक विशेष सुविधा करण्यात आल्या असून जगातील अशाप्रकारचे हे पहिलेच पार्क आहे. या पार्कमध्ये रिव्हर बोट राईड, पावसाचे पडदे आणि आणखी बरेच काही करण्यात आले आहे. याशिवाय दिव्यांग मुलांसाठी विशेष पद्धतीच्या व्हीलचेअरही याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

हे पार्क तयार करताना डॉक्टर, थेरपिस्ट, विशेष मुलांना शिक्षण देणारे शिक्षक, या मुलांच्या हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते यांच्याशी सल्लामसलत करुन विकास करण्यात आला आहे. या कल्पनेचे सगळ्यांनी स्वागत केलंय अशा प्रकारचं पार्क फक्त अमेरिकेतच नाही तर जगात प्रत्येक देशात असायला हवं असं मतही अनेकांनी मांडलं आहे.