कोलकाता येथील एका कॉलेजने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जारी केलेल्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये चक्क बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचं नाव टॉपर म्हणून घोषित केल्याचं समोर आलं आहे. कोलकात्याच्या आशुतोष कॉलेजमध्ये हा विचित्र प्रकार घडलाय. कॉलेजने बीए ऑनर्स (BA Honours, English) प्रवेशासाठी जारी केलेल्या यादीत सनी लिओनीचं नाव सर्वात वरती होतं. ही यादी कॉलेजच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली होती.


वेबसाइटवर जाहीर केलेल्या यादीमध्ये अर्जाचा क्रमांक आणि रोल नंबरही होता. या यादीमध्ये सनी लिओनीला १२ वीच्या बोर्ड परीक्षेत सर्व विषयांमध्ये ( बेस्ट ऑफ फोर ) १०० पैकी १०० गुण देण्यात आले होते. पण, हे कोणीतरी जाणूनबुजून केल्याची प्रतिक्रिया कॉलेजच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

“हे खोडकर काम आहे, कोणीतरी जाणूनबुजून सनी लिओनीच्या नावाने चुकीचा अर्ज पाठवला. आम्ही संबंधित विभागाला चूक सुधारण्यास सांगितले असून या घटनेची चौकशीही केली जाईल”, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, या घटनेमुळे कॉलेजच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.