सालाबादप्रमाणे यंदाही ऑनलाइन फूड डिलेव्हरी अॅप असणाऱ्या स्विगीचा वार्षिक अहवाल समोर आला आहे. भारतीय कोणते पदार्थ सर्वाधिक मागवतात यासंदर्भातील अहवालाबरोबरच यंदा स्विगीने ऑनलाइन किराणामाल मागवताना भारतीय लोक कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतात याचीही आकडेवारी दिलीय.
स्विगीकडून देशातील ५०० शहरांमध्ये किराणामाल घरपोच देण्याची सेवा सुरु करण्यात येते. इन्स्टास्मार्ट सेवेअंतर्गत किराणामाला ग्राहकांना थेट घरपोच दिला जातो. २०२१ मध्ये स्विगीवरुन दोन कोटी ८० लाख फळं आणि भाज्यांची ऑर्डर करण्यात आल्यात. यामध्ये टोमॅटो, केळी, कांदे, बटाटे आणि मिरची या पाच गोष्टी सर्वाधिक मागवण्यात आलेल्या गोष्टी ठरल्यात.
नक्की वाचा >> चिकन बिर्याणी सर्वाधिक पसंतीची डीश, दर मिनिटाला येतात ११५ ऑर्डर्स; मुंबईकरांची पहिली पसंती मात्र…
१४ लाख इन्स्टंट नूडल्स पाकिटं, ३१ लाख चॉकलेटची पाकिटं, २३ लाख आइस्क्रीम्स आणि वेफर्सची ६१ लाख पाकिटांची ऑर्डर स्विगीच्या या सेवेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलीय. रात्री १० नंतर मागवण्यात आलेल्या वस्तूंमध्ये वेफर्स ही पहिल्या क्रमांकावरील गोष्ट आहे.
स्विगीच्या सेवेवरुन ७० हजार बँडएड्सची पाकिटं, ५५ हजार डायपर्सची पाकिटं, ३ लाख सॅनिटरी नॅपकिनची पाकिटं १५ ते ३० मिनिटांमध्ये डिलिव्हर करण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे. तसेच करोना कालावधीमध्ये १ लाख मास्क आणि ४ लाख साबण तसेच हॅण्डवॉशची ऑर्डर स्विगीने या सेवेच्या माध्यमातून दिलीय.
स्पेनमध्ये दरवर्षी खेळवण्यात येणाऱ्या टोमॅटिना फेस्टीव्हलमध्ये वापरल्या जाणाऱ्या टोमॅटोंपेक्षा ११ पट अधिक टोमॅटो यंदा भारतीयांनी स्विगीवरुन मागवलेत. म्हणजेच ११ वर्ष टोमॅटिनो फेस्टीव्हल खेळता येईल एवढे टोमॅटो भारतीयांनी मागवले आहेत. भारतीयांनी मागवलेल्या केळ्यांचं वजन हे अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा २.६ पटींने अधिक भरेल एवढ्या मोठ्या संख्येने भारतीयांनी स्विगीवरुन केळी मागवलीय.
सर्वाधिक टीप देणाऱ्या शहरांमध्ये चेन्नईकर आघाडीवर असल्याचं स्विगीचं म्हणणं आहे. एका ऑर्डरच्या वेळेस तब्बल सहा हजारांची टीप देण्यात आलेली. बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये २०२१ साली ८ लाख किलो डोशाचं पीठ स्विगीवरुन डिलिव्हर करण्यात आलंय. सर्वाधिक ऑर्डर या सायंकाळी सात ते रात्री ९ दरम्यान केल्या जातात. ८० टक्के ग्राहक हे ऑनलाइन माध्यमातून पैसे देतात, असं स्विगीचं म्हणणं आहे.