उद्या ६ एप्रिल रोजी देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. हनुमान जन्मोत्सव काही तासांवर येऊन ठेपला असताच उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एका घटनेची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. ती म्हणजे बुधवारी सकाळी कानपूर येथील एका हनुमान मंदिरातील मुर्तीच्या डोळ्यातून अश्रू आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ज्यामध्ये हनुमानांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याचा दावा करण्यात आला होता. या घटनेची माहिती आजतक या हिंदी वृत्तवाहिनीने दिली आहे.
हनुमानांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. व्हायरल व्हिडिओ चकेरी भागातील कोयला नगर भागातील हनुमान मंदिरातील असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही पाहा- Video: वह स्त्री है…महिलेनं ९ सेंकदात केली जादू; आनंद महिंद्राही झाले थक्क
उद्या ६ एप्रिल २०२३ रोजी हनुमान जयंती साजरी केला जाणार आहे. त्या आधीच ही घटना आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने मंदिरात भाविकांनी एकच गर्दी केली होती. व्हिडिओची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त अमरनाथ यादव हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
“व्हिडिओमधील दाव्याची पडताळणी झालेली नाही”
पोलीस आयुक्तांनी मंदिरात जाऊन पाहणी केली असता, प्राथमिक तपासात व्हायरल व्हिडिओमध्ये करण्यात आलेला दाव्याप्रमाणे काहीही आढळले नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आम्ही घटनास्थळी जाऊन हनुमानजींचे दर्शन घेतले आणि पाहणी केली, पण व्हिडिओमध्ये करण्यात आलेल्या दाव्याची पुष्टी तपासात सिद्ध झालेली नाही.
व्हायरल व्हिडीओची चौकशी करणार – एसपी
एसीपी म्हणाले की, हा व्हिडीओ कोणी अफवा पसरवण्यासाठी व्हायरल केला होता का? याचा तपास केला जाईल. तसेच तो कोणत्या उद्देशाने बनवला गेला आणि व्हिडिओ कोणी एडिट केला याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त –
बिहार आणि बंगालमध्ये रामनवमीच्या मुहूर्तावर झालेल्या हिंसाचाराच्या घटना पाहता उत्तर प्रदेशमध्येही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिरांमध्ये मोठी गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर कोणत्याही अफवा पसरवणारे व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे.