अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क थायलंडमधल्या गुहेत अडकलेल्या मुलांच्या मदतीला धावून आले आहेत. रविवारी( ८ जुलै) रोजी या मुलांना गुहेतून बाहेर काढण्याची मोहीम सुरू झाली. आतापर्यंत एकूण आठ मुलांना बाहेर काढण्यात थायलंड नौदलाच्या कमांडोंना यश आलं आहे. तर पाच जण अजूनही या गुहेत आहेत. यामुलांना बाहेर काढण्यासाठी इलॉन यांनी एक पाणबुडी तयार केली असून ही पाणबुडी घेऊन ते थायलंडला पोहोचले आहे. इलॉन यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच इलॉन यांनी मदतीची इच्छा बोलून दाखवली होती. इतकंच नाही तर या मुलांना बाहेर काढण्यासाठी माझ्याजवळ चांगली योजना आहे त्यामुळे हरकत नसेल तर मला मदत करायला आवडेल असं त्यांनी बोलून दाखवलं होतं. छोट्या पाणबुड्यांमधून या मुलांना बाहेर काढता येईल अशी त्यांची योजना होती. गेल्या आठवड्यात त्यांनी प्रात्यक्षिकाचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र त्यांच्या या कल्पनेला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. आता खुद्द इलॉन आणि त्यांची टीम आधुनिक तंत्रानं युक्त पाणबुडी घेऊन थायलंडला पोहोचले आहेत. ही पाणबुडी लहान मुलांच्या उंचीएवढी आहे. यामुळे मुलांना पोहोण्याची गरज भासणार नाही असं इलॉन यांचं म्हणणं आहे.

‘लहान पाणबुडी तयार ठेवली आहे. ‘वाईल्ड बोअर’ टीमवरूनच या पाणबुडीचं नाव ठेवण्यात आलं आहे. भविष्यात या पाणबुडीची गरज लागू शकते’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

थायलंडमधल्या चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत गेल्या १६ दिवसांपासून ही मुलं अडकली आहेत. यातल्या एकूण आठ मुलांना बाहेर आणण्यात यश आलं आहे तर पाच जणांना येत्या काही तासांत गुहेतून बाहेर आणलं जाणार आहे.