नोटाबंदीच्या निर्णयानंतर आलेल्या जुन्या नोटा मोजण्यासाठी रिझर्व्हे बँक ऑफ इंडियांच्या कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्यांना कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे बॅंकेचे कर्मचारी आठवड्याचे सहा दिवस काम करत आहेत. हे काम लवकरात लवकर संपवावे यासाठी सणवारांच्या सुट्ट्या देखील रद्द केल्या असल्याचं ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने सांगितले आहे. बुधवारी आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल संसदेच्या आर्थिक घडामोडी पाहणाऱ्या स्थायी समितीसमोर हजर झाले होते. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. त्याचप्रमाणे चलनातून बाद झालेल्या नोटा मोजण्याच्या कठीण कामात कोणतीही अडचणी येऊ नये, यासाठी नोटा मोजण्यासाठी आधुनिक मशिन्सही घेतली आहेत, असंही पटेल यांनी म्हटलं आहे.
वाचा : अंध दाम्पत्याच्या ‘डोळस’ मुलीच्या ‘त्या’ फोटोमागचं ‘व्हायरल सत्य’ जाणून घ्या!
नोटाबंदीचा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेण्यात आला. या निर्णयानंतर जुन्या नोटा बदलून देण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदतही देण्यात आली होती. पण ३१ डिसेंबर २०१६ च्या रिझव्र्ह बँकेच्या अध्यादेशानुसार नोटाबंदीच्या ५० दिवसांच्या अवधीत देशाबाहेर असणाऱ्या निवासी भारतीय आणि अनिवासी भारतीयांनाच केवळ त्यांच्याकडील जुन्या नोटा त्यांच्या निर्गमनाचे कारण नमूद करून ३० जूनपर्यंत जमा करण्याचा अवधी देण्यात आला होता. त्यानुसार ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांचा ओघ येणं बँकेत सुरूच आहे. आता ३० जूनपर्यंत आलेल्या सर्व जुन्या नोटा लवकरात लवकर मोजून पुढील प्रकियेला सुरूवात करण्याचा भार या कर्मचाऱ्यांवर आलाय. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असते पण आता नोटा मोजण्याचे काम लवकरात लवकर संपावे यासाठी बँक कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक आणि सणांच्या सुट्टया रद्द करण्याचा निर्णय बँकेनी घेतला आहे.
वाचा : लाखो तरुणींना घायाळ करणाऱ्या पाकिस्तानी चहावाल्याचं सत्य उघड!