जिद्द, चिकाटी आणि प्रचंड महत्वकांक्षेच्या जोरावर आपल्या देशाचे नाव मोठे करणाऱ्या अनेक यशोगाथा आजवर आपण पाहिल्या किंवा वाचल्या असतील. महाराष्ट्रातील डॉ. युनूस मुबारक अत्तार हे देखील अशाच प्रकारचे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात चक्क वाहतूक नियंत्रक वर्ग दोन या पदावर मजल मारली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या ट्रॅफिकवर आता महाराष्ट्राचे नियंत्रण असे म्हटले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. युनूस हे सांगलीतील कोकरूडचे रहिवासी आहेत. २००५ साली सासरच्या मंडळींमुळे त्यांना अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. काही कौटुंबिक कारणांमुळे त्यांना तिथेच राहाणे भाग पडले. सुरुवातील उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना पेट्रोल पंप व हॉटेलमध्ये लहानमोठी कामे करावी लागली. दरम्यान त्यांनी टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली. डॉ. युनूस यांनी ज्या दोन गाड्या टॅक्सी म्हणून चालवल्या त्यांचे नाव त्यांनी ‘स्वराज्य’ आणि ‘रायगड’ असे ठेवले होते. टॅक्सीत बसणाऱ्या अमेरिकन प्रवाशांना ते शिवाजी महाराजांचे कर्तृत्व सांगत असत. दरम्यान त्यांनी वाहतूक नियंत्रक या पदासाठी घेतल्या जाणाऱ्या स्थानिक स्पर्धा परिक्षेत भाग घेतला.

दिवसभर ते टॅक्सी चालवायचे व रात्री अभ्यास करायचे. अशा प्रकारे दिवस-रात्र प्रचंड मेहनत करुन ते या परिक्षेत उत्तीर्ण झाले. या परिक्षेत अमेरिकेतील तब्बल २ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. आनंदाची बाब म्हणजे डॉ. युनूस यांनी परिक्षेत १७वा क्रमांक पटकावला.
डॉ. युनूस हे सध्या १५ दिवसांच्या सुट्टीवर आपल्या कोकरूड गावी आले आहेत. त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपली यशोगाथा सांगितली. त्यावेळी त्यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबियांना दिले. शिवाय पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचेही आभार मानले. कारण विश्वास नांगरे पाटील त्यांचे खुप चांगले मित्र आहेत. त्यांनीच डॉ. युनूस यांना या स्पर्धा परिक्षेत भाग घेण्याची प्रेरणा दिली होती. आता येत्या काही दिवसात ते आपला कार्यभार स्विकारणार आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The success story of taxi driver yunus attar mppg
First published on: 27-12-2019 at 17:36 IST