भारतीयांना अच्छे दिनाची स्वप्ने दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देशाच्या विकासासाठी परदेशी वारी करण्यात व्यस्त असणाऱ्या पंतप्रधानांच्या दौऱ्यावर यावेळी एखाद्या राजकीय विरोधकाने नव्हे, तर एका दहा वर्षाच्या मुलाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ओडिशातील एका दहा वर्षाच्या मुलाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे. या पत्रातुन त्याने परदेशी दौरे करण्यापेक्षा पंतप्रधानांनी प्राथमिक सुविधांपासून वंचित असणाऱ्या आपल्या गावाला भेट द्यावी, अशी विनंती केली आहे. ओडिशामधील मलकाणगीरी जिल्हात वसलेल्या ५०५ अदिवासी गावावर सध्या ताप आणि मेंदुच्या विकाराच्या रोगाने थैमान घातले आहे. या आजाराने आतापर्यंत भागातील तब्बल ७३ मुलांचा बळी घेतला आहे.
मालकनगिरी आरोग्य जिल्हाधिकारी उदय मिश्रा यांनी दिलल्या माहितीनुसार, ७३ पैकी २७ मुलांचा मृत्यू हा मेंदुच्या विकाराने झाला असूनअसून इतर मुलांचा मृत्यू हा वेगवेगळ्या कारणाने झाल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या आदिवासी गावावर कोसळलेल्या संकटाला थोपविण्यासाठी शेवटची आस म्हणून उमेश मादीने मोदींना पत्राद्वारे साद घातली आहे. ‘आमचा जीव वाचवा’ हा संदेश पंतप्रधानांपर्यंत पोहचविण्यासाठी १० वर्षाच्या उमेशने पत्र लिहले आहे. या पत्रातून त्याने पंतप्रधानांना आपल्या गावाला भेट देण्याची विनंती केली आहे. माझे अनेक मित्र तापाच्या रोगाचे शिकार झाले असून त्यांच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांनी आपल्या गावाला भेट द्यावी, अशी इच्छा या मुलाने पत्रातून व्यक्त केली आहे.
उमेश माधी नावाचा हा मुलगा पालकंदा प्राथमिक शाळेमध्ये चौथ्या इयत्तेत शिकत आहे. सर तुम्ही वेगवेगळ्या देशात दौरे करत असता, त्याचप्रमाणे आमच्या भागातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या ग्रामीण भागालाही भेट द्यावी, असे उमेशने म्हटले आहे. या ग्रामीण भागातील लोकांची समस्या दुर करण्यासाठी तुम्ही शेवटची उमेद आहात, असा भावनिक उल्लेखही त्याने या पत्रातून केला आहे.