तो व्यवसायाने दातांचा डॉक्टर….मात्र आपण समाजासाठी काहीतरी करावे अशी त्याची कायमच इच्छा होती….आजोबांकडून मिळालेल्या समाजसेवेच्या प्रेरणेतून त्याने एक ‘हट’के शाळा उभारलीय…आता त्याच्या स्वप्नांना मूर्त रुप आले असून या प्रकल्पासाठी त्याने बऱ्याच खस्ताही खाल्ल्या आहेत.
अब्राहम थॉमस या आंध्रप्रदेशमधील तरुणाने शिक्षण देण्याचा ध्यास घेऊन या अनोख्या शाळेची निर्मिती केली आहे. आपले मूळ असलेल्या गोष्टींतून शिकत पुढे गेल्यास चांगल्यारितीने शिक्षण मिळू शकते असे त्याने सांगितले. विद्यार्थ्यांना गाणे म्हणत, नाच करत, निसर्गाच्या सानिध्यात आणि पारंपरिक मूल्ये जपत शिकू शकतील अशी शिक्षणपद्धती असावी यासाठी प्रयत्न करत असल्याचेही थॉमस म्हणाला.
आपला आर्किटेक्ट असणारा मित्र धीरज याच्याबरोबर अब्राहमने आपल्या स्वप्नातल्या या प्रोजेक्टला सुरुवात केली. विशेष म्हणजे या ‘हट’के प्रकल्पासाठी आपल्या भागात उपलब्ध असणाऱ्या साधनांतून त्याने हट म्हणजेच झोपडी बांधण्यास सुरुवात केली. यामध्ये बांबू, स्थानिक माती, दगड यांसारख्या गोष्टींचा वापर करत ही अनोखी हट बांधण्यात आली आहे.
पूर्वीपासून माणूस अशाप्रकारच्या झोपडीतच राहत होता. त्यामुळे त्याची जाण ठेवत आणि आत्याधुनिक गोष्टींचा वापर करत त्याने ही झोपडी बनवली आहे. मुलांमधील स्पार्क बाहेर काढायचा असेल तर त्यांना स्थानिक गोष्टींचे ज्ञान देणे आवश्यक आहे असे अब्राहमचे म्हणणे आहे. तब्बल ८ महिन्यांच्या प्रयत्नांनंतर अब्राहमने हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
आपल्या या अनोख्या शाळेसाठी त्याच्या मित्रांनी त्याला मोठ्या प्रमाणात अर्थिक मदत केली असून त्याने स्वतःही १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. मातृभाषेतून शिक्षण घेत असताना त्यांचे इंग्रजी सुधारावे यासाठी ग्रंथालयाचीही स्थापना करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या संधींचा आनंद लुटता यावा असा मुख्य उद्देश असल्याचेही अब्राहम म्हणाला.