सध्या भारत पाकिस्तानचे संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. उरीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला, या हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेले प्रत्युत्तर आणि आता पाकिस्तानकडून वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन यामुळे वातावरणातील तणाव वाढला आहे. मात्र दोन्ही देशांमध्ये असेही काही घटक आहेत, ज्यांच्या मनात हा तणाव निवळावा अशी इच्छा आहे. अशीच एक पोस्ट सध्या फेसबुकवर चर्चेत आहे.

भारत-पाकिस्तानमधील संबंधांवर भाष्य करणारी एक फेसबुक पोस्ट ‘ह्युमन्स ऑफ पाकिस्तान’कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. पाकिस्तान आणि भारतातील चिमुकल्या मुलांच्या मैत्रीची ही कहाणी सध्या फेसबुकवर चर्चेत आहे. दोन पाकिस्तानी आणि एका भारतीय मित्राची ही कहाणी अनेकांना विचार करायला भाग पाडते आहे.

ह्युमन ऑफ पाकिस्तानच्या या फेसबुक पोस्टमध्ये एक व्यक्ती पाकिस्तानमधील दोन चिमुरड्यांशी संवाद साधते. तेव्हा पाकिस्तानमधील ही दोन मुले नदीपलीकडे राहणाऱ्या त्यांच्या मित्राविषयी सांगतात. ‘आमचा एक मित्र आहे, तो नदीच्या पलीकडे राहतो. तो याच वेळी शाळेतून घरी येतो. तो नेहमी नदीच्या पलीकडे उभा राहून नदीत दगड मारतो. मग आम्हीदेखील नदीच्या पात्रात दगड फेकतो. जो सर्वात लांब दगड फेकतो, तो जिंकतो. आम्ही दररोज हा खेळ खेळतो’, अशी माहिती पाकिस्तानमधील दोन चिमुरडे देतात.

मुलांसोबत संवाद साधणारी व्यक्ती मग त्या दोन मुलांना पलीकडे असणाऱ्या त्या मुलाचे नाव विचारते. यावर या दोन पाकिस्तानी मुलांनी दिलेले उत्तर अतिशय महत्त्वाचे आहे. ‘आम्हाला त्या मित्राचे नाव माहित नाही. नदीचा आवाज इतका प्रचंड असतो की आम्हाला एकमेकांशी संवाद साधता येत नाही. मात्र आम्हाला माहित आहे आमचा तो मित्र भारतीय काश्मिरी आहे. कारण तो नदीच्या पलीकडे आहे’, असे उत्तर दोन पाकिस्तानी मुलांनी दिले आहे.

दोन पाकिस्तानी मुले, एक भारतीय मुलगा, त्यांची मैत्री, मधून वाहणारी नदी आणि त्यांचे त्या नदीत दगड मारणे, या सर्व गोष्टी भारत आणि पाकिस्तानच्या सध्याच्या संबंधांवर भाष्य करणाऱ्या आहेत. दोन्ही देशांमधील विचारी जनांकडून सध्या ही अंतर्मुख करणारी पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर होते आहे. मात्र या विचारी जनांची संख्या कमी असल्याने या पोस्टचा कितपण परिणाम होईल, याबद्दल साशंकता आहे.