कोणीही रातोरात प्रसिद्ध होत नाही. त्यामागे कित्येक दिवसांची मेहनत असते. पण सोशल मीडियावरचे जग काही वेगळे असते. इथे कोण कधी आणि कसा प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही. आता हेच बघा ना एका बिल्डिंगमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणा-या शौविक यांना गाणी गुणगुणायची सवय होती. त्यांच्या याच सुरेल आवाजामुळे आज ते सोशल मीडिया प्रसिद्ध झाले आहे.

वाचा : भारतीय वंशाच्या उद्योजकाने बनवल्या पाण्यात विरघळणा-या प्लास्टिक पिशव्या

कोलकातामधल्या एका बिल्डिंगमध्ये शौविक हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांनाही अनेकांसारखी गाणे गुणगुणायची आवड आहे. त्यांचा हा आवाज या बिल्डिंगमध्ये काम करणा-या आदर्श सिंग या तरुणाने ऐकला. आणि तेव्हापासूनच शौविक यांना चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांने केला. गेल्याच आठवड्यात आदर्शने शौविक यांच्याकडून काही गाणी गाऊन घेतली. त्यानंतर एके दिवशी फेसबुक लाईव्हचा पर्याय वापरूनआदर्शने शौविक यांच्या गाण्याचा व्हिडिओ लाईव्ह केला. शौविकने अरजित सिंगची अनेक गाणी गायली आहेत. त्याचे दोन व्हिडिओ आदर्शने आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केले. आतापर्यंत अडीच लाखांहूनही अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर ३० हजारांहूनही अधिक लोकांनी तो शेअर देखील केला आहे.

कलर्स या हिंदी वाहिनीवर रायझिंग स्टार लाईव्ह हा रिअॅलिटी शो येत आहे. त्यासाठी देखील शौविक १८ डिसेंबरला ऑडिशन देणार आहेत. एका फेसबुक पोस्टमुळे शौविक प्रसिद्ध झाले आहेत. जर या वाहिनीच्या ऑडिशनमध्ये शौविक परिक्षकांचे मन जिंकू शकले तर नक्कीच त्यांचे भविष्य सुधारेल.