कुत्रा हा माणसाचा सगळ्यात ईमानदार आणि जवळचा मित्र असतो. त्याला आपल्यासारखे बोलता येत नसले तरी मालकावर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याला भाषेची मुळीच गरज नसते. त्यामुळे कुत्रा आणि मालक या दोघांमधील नात्याचे हे बंध शेवटपर्यंत घट्टच राहते. याचेच उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेली ‘वॉलनट’ या कुत्र्याची आणि त्याच्या मालकाची गोष्ट होय. रोज सकाळी आपल्या कुत्र्यासोबत फिरायला जाणा-या मार्कला हा सोबती लवकरच आपली साथ सोडून जाणार हे कळले तेव्हा त्याने त्याच्यासोबत शेवटचे फिरायला जाण्याचे ठरवले. तशी पोस्टही त्याने फेसबुकवर टाकली आणि दुस-याच दिवशी मार्क आणि वॉलनट जेव्हा समुद्रकिना-यावर पोहचले तेव्हा वॉलनटला निरोप देण्यासाठी हजारो लोक तिथे जमले होते.

मार्क आणि वॉलनट गेल्या १८ वर्षांपासून एकत्र आहे. मार्ककडे ज्या प्रजातीचा कुत्रा आहे त्याचे आयुमान साधरण १३ वर्षांच्या आसपास असते तरीही १८ वर्षे वॉलनटने मार्कला साथ दिली. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वॉलनटची साथ असल्याने आपल्याला कधीच कोणाची गरज भासली नाही असे मार्क नेहमी सांगतात. पण काही दिवसांपासून वृद्धत्त्वामुळे वॉलनट एका जागी बसून असायचा, तो कधीही प्राण सोडून जाऊ शकतो हे देखील मार्कला माहिती होते, त्यामुळे त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आणि अल्पावधितच या पोस्टला हजारो लोकांनी प्रतिसादही द्यायला सुरुवात केली. हा प्रतिसाद इतका मोठा होता की जेव्हा मार्क आपल्या कुत्र्याला उचलून समुद्रकिना-याजवळ घेऊन आला तेव्हा त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी शेकडो लोक किना-यावर जमले होते.