सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे तीन मुस्लिम मुलींवर मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमातून टीका होत आहे. एड्सविषयी जनजागृती करताना या मुलींनी रस्त्यावर फ्लॅशमॉब सादर केला होता. या तिन्ही मुली मुस्लिम होत्या म्हणूनच त्यांच्यावर सोशल मीडियावर कडाडून टीका आणि शेरेबाजी होताना दिसून येत आहे.
केरळमधील मलप्पूरम शहरातील हा व्हिडिओ आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागाने एड्सविषयी जनजागृती करण्यासाठी फ्लॅशमॉबचं आयोजन केलं होतं. या जनजागृती मोहिमेत तीन मुस्लिम मुलींनी सहभाग घेतला. आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या गाण्यावर त्या डान्स करत होत्या. पण काही समाजकंटकांना मात्र हे रुचले नाही. म्हणूनच धर्माच्या आडून या तिन्ही मुलींवर खोचक टीका करायला सुरूवात केली.
या मुली दंत वैदयकिय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असल्याचं समजतं. एक डिसेंबरपासून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण काही जण मात्र या मुलींच्या बाजूने खंबीरपणे उभे राहतानाही दिसून येत आहे.