वाघाचं नावही काढलं, तर तशीही आपल्यापैकी अनेकांच्या मनात धडकी भरल्याशिवाय राहात नाही. जंगलचा राजा सिंह जरी असला, तर वाघाची जरब काही औरच असते! पण चपळाई आणि हल्ल्याचं तंत्र या बाबतीत वाघालाही मात देईल असा प्राणी म्हणजे बिबट्या. बिबट्याचा तुफान वेग आणि विलक्षण चपळाई भल्याभल्या शक्तिशाली प्राण्यांनाही हार पत्करायला लावू शकते. त्यामुळे बिबट्यानं शिकारीसाठी चाल केली, की समोरच्या प्राण्याचा खेळ खलास झालाच म्हणून समजयाचं! पण रणथंबोरच्या जंगलात जे घडलंय, ते पाहून कुणाचेही डोळे चक्रावतील. कारण या विलक्षण चपळ प्राण्याला तेवढ्यात खमक्या वाघानं मात दिली आहे! भारतीय वन सेवा अर्थात इंडियन फॉरेस्ट सर्विसेसमधील अधिकारी परवीन कासवान यांनी यासंदर्भात केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे!
काय आहे नेमकी ही पोस्ट?
आयएफएस परवीन कासवान हे नेहमीच जंगलाच्या आतलं विलक्षण सौंदर्य, अद्भुत गोष्टी आणि अशा अविश्वसनीय घटनांचे फोटो त्यांच्या ट्विटरवर शेअर करून ते बाहेरच्या जगापर्यंत पोहोचवत असतात. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच एक एप्रिलच्या दिवशी परवीन कासवान यांनी रणथंबोरच्या जंगलातला एक फोटो ट्विटरवर शेअर केला. या फोटोसह त्यांनी “जेव्हा शिकाऱ्याचीच शिकार होते”, अशी कॅप्शन दिली आहे. हा फोटो पाहताक्षणीच बघणाऱ्याच्या मनात धडकी भरवतो, असं अनेक नेटिझन्सनी म्हटलं आहे.
“जेव्हा शिकाऱ्याचीच शिकार होते. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात एक वाघ एका बिबट्याला खात असताना. हर्ष नरसिंहमूर्ती यांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलेली एक दुर्मिळ घटना. तुम्ही असं काही आधी कधी पाहिलंय का?” असा प्रश्न परवीन कासवान यांनी आपल्या पोस्टमध्ये विचारला आहे.
त्यांच्या पहिल्या ट्वीटमध्ये असणाऱ्या फोटोत दिसणारा वाघ त्याच्या ठाम आणि प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या नजरेमुळे समोरच्याच्या काळजात सहज धडकी भरवतो. या फोटोमध्ये एक वाघ दिसत असून त्याच्यासमोर बिबट्याचं शव पडलं आहे. अर्थातच, वाघानं काही वेळापूर्वीच या बिबट्याची शिकार केल्याचं स्पष्ट होतंय. हा वाघ त्याच्या नैसर्गित शैलीमध्ये बसून बिबट्याला खाताना त्याच्यावर नजर रोखून बघत असल्याचं या फोटोत दिसतंय!
परवीन कासवान यांचं दुसरं ट्वीट
परवीन कासवान यांनी याच ट्वीटवर रिप्लायमध्ये दुसरं ट्वीट केलंय. त्यात त्यांनी याच घटनेचा अजून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो वाघ त्याच्या नुकत्याच मरून पडलेल्या भक्ष्याकडे न बघता थेट समोर बघत असल्याचं दिसतंय. यात वाघाचे दातही दिसत आहेत. या फोटोंवरून या दोन्ही अत्यंत कुशल आणि हुशार प्राण्यांमध्ये फोटो काढण्याच्या काही वेळेपूर्वीच थरारक घमासान झालं असणार, याची सहज कल्पना येते.
“वाईल्ड, वाईल्ड वर्ल्ड. रणथंबोरमधल्या या वाघाचं नाव टी १०१ आहे. हर्ष नरसिंहमूर्ती यांनी नुकताच हा फोटो काढला असून सगळ्यांना मला तो दाखवायचा होता”, असं ट्वीट या फोटोसह परवीन कासवान यांनी केलं आहे.