गेल्या चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे केरळमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेकडो गावं वाहून गेलीत तर हजारो लोक बेघर झालेत. हे चित्र पाहून खिन्न झालेल्या मध्य प्रदेशमधल्या विष्णू कच्छवा या विक्रेत्यानं आपल्याजवळ असलेल्या सर्व चादरी विकून पुरग्रस्तांसाठी मदत करण्याचं ठरवलं आहे. विष्णू वयाच्या १६ व्या वर्षी केरळमध्ये पोट भरण्यासाठी आला. घरोघरी जाऊन चादरी विकायचा व्यवसाय तो करतो. या मिळकतीवर विष्णूचं घर चालतं. गेल्या १२ वर्षांपासून याच व्यवसायावर तो आपलं पोट भरत आहेत.
जीव धोक्यात घालून त्यानं वाचवले लहान मुलाचे प्राण
मात्र केरळला पावसाचा तडाखा बसला. इथे सर्वत्र हाहाकार माजला आहे. अर्ध राज्य पाण्याखाली गेलं आहे. विष्णू गेल्या बारा वर्षांपासून कुन्नर जिल्ह्यात राहतो. इथल्या लोकांमुळे विष्णूला व्यवसायात खूपच मदत झाली. पुरामुळे बेघर झालेल्या लोकांना आर्थिक साहाय्य करण्याइतके पैसे त्याच्याजवळ नाहीत. मात्र देवभूमीनं केलेल्या उपकारांची जाण ठेवून विष्णूनं आपल्याजवळ विक्रीसाठी असलेल्या सर्व चादरी दान केल्या आहे.
पावसामुळे लोकांना निवारा नाही मात्र थंडीत उबेसाठी अंगावर चादर हवी असं विष्णूला वाटतं म्हणूनच पुढचा मागचा विचार न करता त्यानं ही मदत देऊ केली आहे. विष्णू आणि त्याचे काही मित्र हरियाणामधून चादरी विकत घेतात. विष्णूचं पोट या व्यवसायावर चालतं, त्यानं जेव्हा सर्व चादरी दान करण्याचा निर्णय सांगितलं तेव्हा आम्हाला धक्का बसला, कारण असं केल्यानंतर त्यांच्यापुढे आर्थिक अडचण उभी राहिली असती पण त्यानं पक्का निर्धार करून सर्व चादरी दान केल्या असं त्याचे मित्र म्हणाले. विष्णूनं दाखवलेल्या या माणुसकीचं सगळीकडूनच खूप कौतुक होत आहे.