तुम्हाला फिरायला आवडतं का? या प्रश्नाचं उत्तर कोणीही नाही म्हणून देणार; नाही. सगळ्यांनाच आपल्या त्याच त्या शेड्युलमधून वेळ काढत फिरायला, बाहेरगावी किंवा परदेशी जायलाही आवडतं. पण यासाठी वेळ काढा, सुट्ट्या घ्या, खर्चाचा हिशोब करा, मग रिझर्व्हेशन करा या सगळ्या गोष्टींनी आपण प्रवासाआधीच दमून जातो. पण कोणी तुम्हाला फिरण्याचेच पैसे दिले तर? म्हणजे तुम्ही फक्त फिरायचं आणि त्याबद्दल तुम्हालाच कोणीतरी पैसे देणार. असं काही आपल्याला सापडलं तर आपण बाबा फिरणं थांबवणारच नाही.

वरच्या फोटोमधल्या दोघांना हे भाग्य लाभलं आहे. २८ वर्षांचा जॅक माॅरिस आणि त्याची २४ वर्षांची मैत्रिण लाॅरा बुलेन असे अनेक देश फिरतात आणि त्याचं ‘व्ही-लाॅग’ म्हणजेच व्हिजुअल ब्लाॅग तयार करतात. त्यांच्या या पोस्टस् एवढ्या फेमस झाल्या आहेत की लाखो लोकं त्यांचा हा व्ही- लाॅग पाहतात आणि त्या ‘हिट्स’चे त्यांना पैसे मिळतात.

जॅकने २०१२ साली त्याच्या नोकरीला रामराम ठोकला आणि तो सरळ थायलंडला बँकाॅकमध्ये गेला. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या देशांना भेट देण्याचा सपाटा लावला. आपल्या या सगळ्या सफरीचा त्याने व्ही लाॅग बनवला. तो फिजी देशाला भेट देत असताना त्याची आणि लाॅराची भेट झाली आणि त्यानंतर ते दोघे एकत्र वेगवेगळे देश पाहत जगभर फिरू लागले. हा सर्व वेळ ते त्यांचा ट्रॅव्हल ब्लाॅग रेकाॅर्ड करत असतात. त्यांच्या ब्लाॅगला लाखो हिट्स मिळतात. आणि त्यावर येणाऱ्या जाहिरातींमुळे  सोशल नेटवर्किंग साईट्स त्यांना  पैसे देतात आणि ही रक्कम सहा आकड्यांच्या घरात जाते!