मुंबईकरांसाठी पाऊस म्हणजे काय हे वेगळं सांगायला नको. इथे पावसाळा म्हटलं की मुंबईची ‘तुंबई’ होणार हे नक्की! त्यातून लोकल बंद , रस्त्याचे रूपांतर नद्या नाल्यात होणं आणि जस जसा पाऊस जोर धरू लागेल तेव्हा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण होणं हे सारं काही मुंबईकरांच्या अंगवळणी पडलं आहे. तेव्हा यावेळीच्या पावसात या पेक्षा नवं काही पाहायला मिळणार अशी शक्यता काही मुंबईकरांना नाही. आता मुंबईत जे काही बदल पाहायला मिळतील तेव्हा मिळतील पण ट्विटरवर मात्र या पावसाळ्यात एक वेगळाच बदल पाहायला मिळणार आहे.

खास पावसाळ्यानिमित्त ट्विटर इंडियाने नवे इमोजी लाँच केले आहे. तेव्हा ट्विटरवर पावसाशी निगडीत काहीही टि्वट करताना जर #indiarains, #MumbaiRains, #बारिश हे हॅशटॅग वापरले तर पुढे छत्रीचा इमोजी दिसणार आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या ट्विटरच्या नव्या हॅशटॅश आणि इमोजीची माहिती दिली आहे. तसेच मुंबईकरांना मान्सूनच्या शुभेच्छाही द्यायला ते विसरले नाही. यापूर्वी ट्विटर इंडियाने दिवळी आणि गणपतीनिमित्त असे खास इमोजी आणले होते.