नोटाबंदीनंतर जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद होऊन नव्या पाचशे आणि २ हजारांच्या नोटा आल्या. खरे तर नवी दोन हजारांची नोट आली म्हणून सगळ्यांनाच आनंद झाला पण या आनंदावर लवकरच विरजण पडले कारण हातात दोन हजारांची नवी नोट असली तरी सुटे पैसे मात्र कोणाकडेच नव्हते. या दोन हजारांचे सुटे द्यायला कोण तयार होईना. त्यामुळे अनेकांना गरज नसतानाही जास्त किमतीचे सामान घ्यावे लागायचे. तेव्हा दोन आठवड्यातच ही दोन हजारांची नोट नको रे बाबा! असे म्हणण्याची वेळ लोकांवर आली. पण आपल्याकडे असेही लोक आहेत की त्यांनी या जवळपास वाळीत टाकलेल्या २ हजार रुपयांच्या नोटेचा असा काही वापर करून घेतला की ते पाहून तुम्ही डोक्यावर हात माराल.

वाचा : ऐकावे ते नवलच! २०१७ मध्ये निघालेले विमान २०१६ ला पोहोचले

ट्विटरवर क्रिश अशोक यांनी उबर चालकाचा एक किस्सा शेअर केला आहे. ‘चेन्नईत उबरने प्रवास करताना आपली टॅक्सी टोल नाक्याजवळ आली तेव्हा चालकाने २ हजार रुपयांची मागणी केली. सुरूवातली मी त्याला एवढे पैसे का हवे असे विचारले तेव्हा या चालकाने फक्त मजा बघा असे उत्तर दिले. ही टॅक्सी जेव्हा टोल नाक्याजवळ आली तेव्हा चालकाने दोन हजारांची नोट पुढे केली. दोन हजारांची नोट पाहून टोलनाक्यावरील कर्मचा-यांनी सुटे पैसे नसल्याचे कारण देत आम्हाला टोल न भरताच पुढे जाऊ दिले.’ क्रिश यांचे हे ट्विटर व्हायरल होत आहे. उबर चालकाने टोल पासून सुटका करून घेण्यासाठी जी शक्कल लढवली हे ऐकून अनेकांनी डोक्यावर हात मारला. पण क्रिश अशोक यांच्यावरही ट्विटरवर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. कारण असा गैरप्रकार होत असताना ते गप्प का बसले असा सवाल केला जात आहे.