अमेरिकेमधील आकाशात एक रहस्यमय प्रकाशाचा गोळा दिसल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली. अॅरेझॉना प्रांतातील फिनिक्स शहरातून मंगळवारी रात्री साडेआठ वाजता आकाशात एक तेजस्वी गोळा दिसला. या घटनेनंतर शहरात अनेक शक्यतांवर चर्चा होऊन त्या संदर्भातील मेसेजेस आणि व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. काही लोकांनी ही वस्तू म्हणजे परग्रहावरील लोकांचे यान म्हणजे युफएओ असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

दुसऱ्या एका शक्यतेनुसार हा मोठ्या उल्केचा तुकडा असल्याचे म्हटले जात आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यामुळे घर्षणाने तो जळू लागल्याने तो प्रकाशमान झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेकदा असे मॉर्फ व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतात. ज्यामध्ये एडिटींग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशी वस्तू दिसल्याचा भास निर्माण केला जातो. मात्र फिनिक्स शहराच्या आकाशात दिसलेली ही वस्तू अनेक नागरिकांनी प्रत्यक्षात पाहिली आहे. त्याशिवाय शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरांमध्येही ही घटना रेकॉर्ड झाली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये थोडी घबराट निर्माण झाली मात्र त्यानंतर कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केल्यानंतर शहरामधील चर्चा थांबल्या. अद्यापही ही वस्तू नक्की काय होती, याबद्दल ठोस अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सीटी ऑफ फिनिक्स, एझेड या शहराच्या स्थानिक सरकारच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.