या जगात काहीही होऊ शकते, एखाद्या घराचे कुंपण ओलांडल्यावर बकरी तुरूंगात जाऊ शकते किंवा झाडांची पानं खाल्ली तर म्हशीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. हा विनोद वगैरे आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा विनोद अजिबातच नाही. उत्तर प्रदेशमध्ये चक्क एका म्हशीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या म्हशीचा गुन्हा काय तर तिने चारा समजून रोपटी खाल्लीत. पोलीस गुन्हा दाखल करण्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी त्या म्हशीला चक्क अटक केली आहे.
उत्तर प्रदेशमधील खीमपुर इथल्या खिरी जिल्ह्यात हा प्रकार घडलाय. या जिल्ह्यात बलदेव महाविद्यालय आहे. या कॉलेज परिसरात वन विभागाने रोपटी लावली होती. पण या परिसरात एक म्हैस शिरली आणि तिने ही रोपटी फस्त करून टाकली. आता म्हशीचा हा ‘प्रताप’ पाहून कॉलेज प्रशासनाने पोलिसांना बोलावून घेतले. कहर म्हणजे पोलिसांनी या म्हशीला अटक केली आणि तिच्यावर गुन्हा देखील दाखल केला. तेव्हा उत्तर प्रदेश पोलिसांनी पकडलेल्या हा नव्या आरोपीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता काही दिवसांपूर्वी जर बिहारचे पोलीस लाखो लिटर दारू रिचवण्याचे आरोप चक्क उंदरांवर करू शकतात, तिथे युपीच्या पोलिसांनी म्हशीला अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल केला तर नवल वाटायला नको.