टेक्सास ए अँड एम विद्यापिठातून पदवी संपादन केलेल्या मॅकेन्झी नोलँडला दीक्षांत सोहळा आपल्या जिवलग मित्राविना अपूर्णच वाटला म्हणूनच पदवी मिळाल्यानंतर तिनं लगेच आपल्या जिवलग मित्रांची भेट घेतली. मॅकेन्झीनं वाईल्डलाईफ अँड फिशरीज् सायन्स या विषयातून पदवी संपादन केली आहे.
मात्र पदवी संपादन केल्यानंतर ती लगेच विद्यापिठाच्या आवारात असलेल्या तळ्याकडे धावत गेली. कारण सर्वात अनमोल क्षण तिला तिच्या बेस्ट फ्रेंड सोबत शेअर करायचा होता. हा बेस्ट फ्रेंड म्हणजेच तळ्यात असणारी मगर होय. या विद्यापिठाच्या आवरात ब्युमाँट रेस्क्यू सेंटर आहे. जिथे ४५० मगर, सुसर आणि इतर सरपटणारे प्राणीदेखील आहेत.
या रेस्क्यू सेंटरमध्ये तिनं इंटर्नशिप केली. येथे टेक्स नावाच्या मगरीसोबत तिची गट्टी जमली. टेक्सची काळजी घेणं त्याच्या खाण्याची व्यवस्था करणं, त्याला खाणं भरवणं अशा जबाबदाऱ्या मॅकेन्झीच्या होत्या. या काळात तिला टेक्सचा खूपच लळा लागला. शिक्षण घेत असताना तिची टेक्सशी चांगलीच गट्टी जमली. वाईल्डलाईफ अँड फिशरीज् सायन्स शिकताना तिला या प्राण्यांविषयी अनेक गोष्टी समजून घेण्यास मदत होऊ लागली.
मॅकेन्झीचे हे फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाले. साहजिक मगरीसोबत फोटो काढताना तुला भीती नाही का वाटली? असे प्रश्न अनेकांनी तिला विचारले. मात्र आपण लहानपणापासून प्राण्यांच्या सहवासात होतो त्यामुळे त्यांच्या जवळ जाण्याची कधीही भीती वाटली नाही असं मॅकेन्झी म्हणाली.