Energy Minister Ak Sharma Video Viral: उत्तर प्रदेशचे ऊर्जा मंत्री एके शर्मा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी त्यांना या व्हिडीओवरून ट्रोलही केले आहे. सुलतानपुरा येथे एका कार्यक्रमासाठी एके शर्मा आले असताना त्यांना स्थानिकांनी घेरले आणि वीज वेळेवर येत नसल्याबाबतची तक्रार केली. यानंतर वीजेचा प्रश्न सोडविण्याऐवजी मंत्री महोदय त्याठिकाणाहून केवळ धार्मिक नारे देऊन निघून गेले. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये अनियमित वीज पुरवठ्याचा गंभीर प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचा आरोप केला जात आहे. वीज पुरवठा सारखा खंडीत होतो, अशी तक्रार अनेकांनी सोशल मीडियावरही व्यक्त केली आहे. तसेच याबद्दल ठिकठिकाणी निदर्शने झाली आहेत. हाच प्रश्न खुद्द मंत्र्यांसमोर मांडल्यानंतर त्यांच्याकडून काही ठोस कृतीऐवजी केवळ धार्मिक नारेबाजी होत असल्यामुळे आता नाराजी व्यक्त होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काय दिसले?

एक कार्यक्रम आटोपून एके शर्मा आपल्या वाहनाकडे निघाले होते. यावेळी काही स्थानिकांनी त्यांच्याजवळ जात, ‘साहेब आमच्याकडे केवळ तीन तास वीज येते’, अशी तक्रार केली. तक्रार करणारे स्थानिक व्यापारी असल्याचे सांगितले जाते. अपूरा वीज पुरवठा होत असल्यामुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे व्यापारी व्हिडीओमध्ये सांगत आहेत.

स्थानिक पोटतिडकीने आपला प्रश्न मांडत असताना मंत्री ऊर्जा मंत्री मात्र हारतुरे स्वीकारण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहेत. त्यांनी व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर ‘मी पाहतो’ एवढेच म्हटले आणि हात वर करून जय श्रीराम, जय बजरंग बली, अशा घोषणा दिल्या. त्यानंतर ते गाडीत बसून निघून गेले.