आपल्या राजकीय वक्तव्यांसाठी तसेच गाण्यांसाठी कायमच चर्चेत असणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांनी व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त एक विशेष ट्विट केलं आहे. अर्थात या ट्विटमध्ये त्यांनी व्हॅलेंटाइन्स डेचासंदर्भ दिला असला तरी हे ट्विट त्यांच्या आगमी गाण्याबद्दलचं आहे. अमृता फडणवीस यांनी आपलं नवीन गाणं लवकरच प्रदर्शित होत असल्याची घोषणा करताना स्वत:चा एक फोटोही पोस्ट केलाय.

अमृता यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी स्वत:चा एक क्रोमा बॅकग्राऊण्डवरील फोटो पोस्ट केला असून या फोटो अमृता यांच्या चेहऱ्यासमोर त्रिशूळ दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी, “मी आता आणि यापुढे कायमच तुला निवडलं आहे. तू माझ्या हृदयात, मनात, आत्म्यात, विश्वासात आणि श्वासात आहेत. ज्या दिवशी आपल्या प्रिय लोकांबद्दल प्रेम व्यक्त करायचं असतं त्या व्हॅलेंटाइन डेनिमित्त मी माझ्याकडून संगीतमय कौतुक करणार आहे माझ्या रुद्रचं,” अशी कॅप्शन दिलीय. या ट्विटमध्ये त्यांनी लॉर्ड शिवा म्हणजेच भगवान शंकरासाठीचा हॅशटॅगही वापरला आहे. फोटोवरुन आणि कॅप्शनवरुन तरी हे गाणं भगवान शंकरासंदर्भातील असल्याचे संकेत अमृता यांनी दिलेत.

व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्ताने मागील वर्षीही अमृता यांचं एक गाणं प्रदर्शित झालं होतं. ते एक प्रेमगीत होतं. ‘ये नैना डरे डरे’ असं या गाण्याचं शिर्षक होतं.  हे रोमॅन्टीक गाणं असलं तरी मी या गाण्यामध्ये स्वत:चीच व्हॅलेंटाइन असल्याप्रमाणे एन्जॉय केलं. हा अनुभव खूप छान होता, असं ट्विट करत अमृता यांनी या गाण्याची लिंक मागील वर्षी शेअर केलेली.

मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये अमृता यांना त्यांच्या गाण्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंग संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला. ट्रोलिंग आणि टीका वाचून निराश व्हायला होतं का?, असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना अमृता यांनी, “मी कानसेन पण आहे आणि थोडी तानसेन पण आहे. मी चांगल्या लेव्हलपर्यंत गाणं शिकलेलं आहे लहानपणापासून. त्यामुळे मला माझे प्लस पॉइण्ट काय आहेत आणि मायनस पॉइण्ट काय आहेत हे ठाऊक आहे. जे ट्रोलिंग होत आहे ते राजकीय दृष्ट्या केलं जात आहे की सामान्यांकडून केलं जात आहे हे मला ठाऊक आहे,” असं उत्तर दिलं होतं.

“जेव्हा स्वत:वर एक विश्वास असतो तेव्हा आपल्याला ठाऊक असतं की आपण किती लायक आहोत. माझं अत्ताचं गाणं होतं ते सामाजिक गाणं होतं. स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भात होतं. त्यावर काय प्रकारचं ट्रोलिंग झालं ते पाहिलं आपण. मला वाटतं की हे खरे लोकांचे, सामान्य लोकांचे विचार नाहीयत. मला वाटतं की मला तेवढी बुद्धी आहे. माझ्या आसपासच्यांना तेवढी बुद्धी आहे की ते मला डायरेक्ट करु शकतात तू बरोबर करते आहे की नाही. त्यांनीही मला म्हटलं की यात काहीही गैर नव्हतं आणि मी आतापर्यंत जे केलं त्यातही काहीही चुकीचं नव्हतं,” असंही अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.