बारावीच्या परीक्षेत ९९ % टक्के गुण मिळवेल्या गुजरातमधल्या वर्शील शहा या मुलाची एका वेगळ्याच कारणाने चर्चा होते आहे. या १७ वर्षांच्या मुलानं संन्यासी व्हायचा निर्णय घेतला, आणि आज सूरतमधल्या तापी नदीच्या किनारी शेकडो लोकांसमोर त्याने दीक्षा घेतली. या दीक्षांत सोहळ्यासाठी त्याच्या कुटुंब आणि नातेवाईकांसह शेकडो लोक उपस्थित होते. या दीक्षांत कार्यक्रमात आपल्या साऱ्या मोह मायेचा त्याग करून त्याने श्वेत वस्त्र धारण केली. दीक्षा घेतल्यानंतर आता वर्शील सुविर्यरत्न विजयजी महाराज या नावाने ओळखला जाणार आहे.

बारावीत ९९ टक्के मिळवूनही मला आनंद झाला नाही पण अधात्मचा मार्ग मला आनंद मिळवून देईल, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.  बारावीत विज्ञान शाखेतून तो ९९ % मिळवून उत्तीर्ण झाला. इतकं घवघवीत यश मिळवूनही साऱ्या मोह, मायेचा त्याग करून संन्यासी बनण्याचा धाडसी निर्णय घेऊन त्यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
गुजरातमधल्या पालदी येथे राहणारे वर्शीलचे वडील आयकर विभागात कार्यरत आहेत. शाळेत असल्यापासूनच वर्शीलचा अध्यात्माकडे ओढा होता. शाळेत असतानाच वर्शीलची जैन मुनी आणि अनेक संन्यासींची भेट झाली. त्यातले अनेक जण आपापल्या क्षेत्रात उच्चपदावर होते. पण त्यांनी देखील संन्यास घेतला. जेव्हा संन्यासी जीवनातच खरं सुख असतं, ही गोष्ट वर्शीलला त्यांच्याकडून समजली, तेव्हापासूनच संन्यासी होण्याचा आपला निर्धार त्याने अधिक पक्का केला. केवळ आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत करून वर्शीलने ९९ टक्के मिळवले. पण करिअर घडवण्याच्या शर्यतीत रस नसलेल्या वर्शीलने त्यानंतर मात्र वैराग्याचं जीवन जगण्याचा मार्ग अवलंबला.