भव्य मंडप, संगीत, हळद, डीजे, पालखी किंवा फिरत्या स्टेजवरून वधू-वराचे आगमन, असा लग्नसोहळ्यांचा एकंदरीत थाट सध्या आपल्याला पाहायला मिळतो. ‘डेस्टिनेशन वेडिंग’ ते प्रसिद्ध अभिनेत्यांनी केलेल्या लग्नानुसार तरुण मंडळी स्वतःच्या लग्नाची ‘थीम’ ठरवितात. अशा भव्य सोहळ्यांमध्ये जेवणाचेदेखील असंख्य पर्याय ठेवलेले असतात.

अशा किंवा कोणत्याही लग्नाला गेलेल्या बहुतांश मंडळींचे लक्ष हे लग्न लागल्यानंतर जेवणाचा बुफे सुरू झाला की नाही याकडे जास्त असते. गंमत म्हणजे नकळत आपणही यापैकीच एक असतो… हो ना? पुरी, श्रीखंड, गुलाबजाम, पुलाव, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, विविध प्रकारचे चाट, आइस्क्रीम… बापरे! कितीही लिहिले तरी लग्नाच्या जेवणात ठेवल्या जाणाऱ्या पदार्थांची यादी काही संपायची नाही. एवढे विविध पदार्थ आपल्यासमोर असल्यावर सगळ्या पदार्थांची चव घेऊन बघण्याची इच्छा किंवा मोह साहजिकच आपल्याला होणारच.

हेही वाचा : बापरे! पठ्ठ्याने फस्त केला इडलीचा डोंगर; Video पाहून नेटकरी म्हणाले “….हा तर बकासुर!”

मात्र, असे करताना आपण पानामध्ये किती पदार्थ घेत आहोत, घेतलेले पदार्थ आपण संपवू शकतो की नाही याचे भान कधी कधी आपल्याला राहत नाही. परिणामी अन्नपदार्थ वाया जातात अथवा पोटाला तडस लागेपर्यंत जेवण जेवले जाते. परिणामी नंतर पित्त, अपचन यांसारख्या समस्यांचा त्रास सहन करावा लागू शकतो. परंतु, सोशल मीडियावर सध्या लग्न-समारंभात मोजक्या प्रमाणात जेवण कसे करावे याची एक भन्नाट ट्रिक व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवरील @bhawnapreet_kaur_sahni नावाच्या अकाउंटवरून लग्न-समारंभांमध्ये प्रमाणात कसे जेवावे हे दाखविणारा एक व्हिडीओ शेअर झाला आहे. त्यामध्ये नेमके काय केले गेलेय ते पाहू.

व्हिडीओमधील स्त्रीने आपल्या जेवणाच्या ताटात भात घेतलेला आहे; मात्र त्याला ‘अधिक’ चिन्हासारखा आकार दिला आहे. आता त्या अधिक चिन्हाने ताटामध्ये तयार झालेल्या चार रिकाम्या भागात, बुफेमध्ये लावलेल्या विविध भाज्या ती महिला पानात वाढून घेते. असे केल्याने तुम्हाला सर्व पदार्थांची चव चाखताही येऊ शकते, तसेच सर्व गोष्टी प्रमाणात घेण्यासही मदत झालेली या व्हिडीओमधून दिसून येते.

तुम्ही जर ‘फूडी’ असाल, तुम्हाला खाण्या-पिण्याची आवड असेल, तर केवळ लग्न-समारंभातच नाही, तर कुठेही या ट्रिकचा वापर करू शकता. अनेकदा आपण आवडीने एखादा पदार्थ खायला घेतो; मात्र त्याची चव न आवडल्याने किंवा घेतलेला पदार्थ संपल्याने आपल्याला अन्न टाकून द्यावे लागते. अन्नाची अशी नासाडी होऊ नये, ते वाया जाऊ नये यासाठी ही सोपी हॅक वापरून पाहायला हरकत नाही; नाही का?

हेही वाचा : तरुणाने चक्क मगरीच्या पिल्लाला Kiss केले आणि…; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “मूर्खासारखे…”

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला आतापर्यंत ४.३ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.