Video of Kanpur police officer pushing a woman to the ground goes viral | Loksatta

पोलिसाने दिला महिलेला धक्का, जमिनीवर लोळत आरडाओरडा करणाऱ्या महिलेचा Video पाहून नेटकरी संतापले

पोलिस आरोपींना जीपमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत असताना, आरोपींचे नातेवाईक पोलिसांना विरोध करताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत

Kanpur police Viral Video
पोलिसांनी महिलेला धक्का देऊन रस्त्यावर पाडलं. (Photo :Twitter)

सध्या सोशल मीडियावर पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने महिलेला धक्का देत जमीनीवर पाडल्याचं दिसतं आहे. या घटनेमुळे नेटकऱ्यांनी पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय रस्त्यावर ढकलून दिलेल्या महिलेला निर्दयीपणे पोलिसांनी वागणूक दिल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ कानपूरमधील असल्याची माहिती समोर आली आहे. तर पोलीस काही आरोपींना विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यासाठी पोहोचले असताना ही घटना घडली. या व्हिडीओत पोलिस काही आरोपींना जीपमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत असताना त्या आरोपींचे काही नातेवाईक पोलिसांना विरोध करतायत. यावेळी आरोपींच्या नातेवाईकामधील एक महिला देखील पोलिस जीपकडे जाताना दिसतं आहे.

त्याचवेळी वर्दीमध्ये असलेल्या एका पोलीस अधिकारी त्या महिलेला खाली ढकलताना दिसतं आहे. पोलिसांनी धक्का देताच महिला जमिनीवर पडून जोरजोरात आरडाओरडा करत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहे. कानपूर येथील हलीम कॉलेज चौकीचे प्रभारी आफताब आलम, असं वृद्ध महिलेला धक्का देणाऱ्या अधिकाऱ्याचं नावं असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही पाहा- Video: हवेतून उडणारं विमान थेट विजेच्या तारांमध्ये घुसलं, ९० हजार घरात…

दरम्यान, या सर्व घटनेवर नेटकरी चांगलेच संतापले असून, “पोलिसांनी महिलेला या प्रकारे वागणूक द्यायला नको होती, योग्य पद्धतीने देखील त्या महिलेला बाजूला करता आलं असतं” अशा प्रतिक्रिया काही नेटकरी देत आहेत. तर “पोलिसांना त्यांचे काम करुन द्यायला पाहिजे, कुटुंबीयांनी या प्रकारे अडथळा आणणे चुकीचं” असल्याचंही काही नेटकरी म्हणत आहे. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओनंतर पोलिसांवर काही कारवाई करण्यात येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ हिमांशु तिवारी नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या खाली कानपूर पोलिसांनी उत्तर दिलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “पोलीस काही आरोपींना पकडायला आले असता, त्यांच्या घरातील लोक त्या आरोपींना घेऊन जाण्यास विरोध करत होते. त्याचवेळी संबंधित महिला मध्ये आल्याने त्यांना धक्काबुक्की झाली” असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 12:48 IST
Next Story
धावत्या एक्स्प्रेसने महिलेला फरफटत नेलं, RPF जवानाने धाव घेतली अन्….; पाहा रेल्वे स्थानकावरील थरारक Viral Video