तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो. त्यात सतत गुंतत असल्याने लहान मुलांनाही त्याबाबत आकर्षण वाटतं. त्यामुळे मुलंही फोनसाठी हट्ट करतात. त्यांच्या टोकाच्या हट्टापायी पालक त्यांना तात्पुरतं शांत करण्यासाठी मोबाईल हाती देतात. मात्र नंतर त्याचं रुपांतर सवयीत होतं. अशाच एका पालकाने आपल्या मुलाच्या हाती फोन दिला. मात्र यामुळे त्यांच्या बँक खात्यातील ९२ हजार रुपये गेल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ही घटना ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील आहे. एका पाच वर्षांच्या मुलाने वडिलांच्या फोनमधून ९२ हजार रुपयांची शॉपिंग केली. सध्या ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. ही बातमी वाचून अनेक पालकांनी धसका घेतला आहे.

उबेर इट्स या फूड डिलिव्हरी अ‍ॅपवरून मुलाने ९२ हजार रुपयांचे आइसक्रिम आणि इतर खाण्याच्या वस्तू ऑर्डर केल्या. याबाबतची वृत्त स्थानिक वृत्तपत्र ‘द स्टार’मध्ये छापण्यात आलं आहे. अ‍ॅपवर वडिलांच्या ऑफिसचा पत्ता टाकण्यात आला होता. त्यामुळे केलेली ऑर्डर ऑफिसच्या पत्त्यावर गेली. याबाबतची माहिती दुकानाच्या मालकाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. मुलाने ७ केक, डल्से डे लेशेचे जार, कँडल्स, मॅसिन जर्सी मिल्कच्या ५ बाटल्या आणि आइसक्रिम ऑर्डर केलं. यात ६२ हजारांचं फक्त आइसक्रिम होतं.

Viral Video: दिल्लीतील एका व्यक्तीने बनवली ‘पार्ले जी’ बिस्किट बर्फी; रेसिपी पाहून नेटकरी म्हणाले…

सामान ऑफिसच्या पत्त्यावर पोहोचल्याचा मॅसेज पाहिल्यानंतर वडिलांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यांना सुरुवातीला काही कळलंच नाही. त्यांना वाटलं आपली फसवणूक झाली आहे. त्यामुळे त्यांनी लगेच फोन केला माहिती जाणून घेतली. त्या दिवशी नेमका वीक ऑफ असल्याने त्यांनी तात्काळ ऑफिसमध्ये धाव घेतली आणि सामान ताब्यात घेतलं. ही घटना लोकांमध्ये सध्या चर्चेचा विषय आहे. नेटिझन्स यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.