एक छायाचित्र हजार शब्दांच्या बरोबर असते असे म्हटले जाते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आजी आणि नातीची भेट असल्याचे दिसतेय. सध्या सोशल मीडियावर हा फोटो झपाट्याने शेअर केला जात आहे. त्या फोटोसोबत लिहलेले शब्द लोकांच्या ह्रद्याचा ठाव घेऊन जात आहेत. फोटो पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रु तरंगल्याशिवाय राहणार नाहीत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि क्रिकेटर हरभजन सिंह यांनीसुद्धा हे भावुक क्षण आपल्या फेसबुक आणि टि्वटर अकाऊंटवर शेयर केले आहेत.

या फोटोतली १४ वर्षांची ही मुलगी वर्गमित्रांबरोबर वृद्धश्रामाला भेट देण्यासाठी गेली होती. तेथील वृद्धांसोबत तिने मनमोकळ्यापणे गप्पा मारल्या. अशातच एका आजीशी ती बोलत असताना तिच्या लक्षात आलं की ही आपली सख्खी आजी आहे आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. त्या चिमुकलीने आई-बाबांकडे आजीची चौकशी केली. आजी नातेवाईंकाकडे गेल्याचे तिला आई-बाबांनी सांगितले. सध्या हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. आपला असा समाज आहे का? आपण लहान मुलांना असे शिकवणार आहोत का? यासरखे प्रश्न विचारले जात आहेत

मन हेलावून टाकणारे ११ वर्षापूर्वीचे हे भावुक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बीबीसीने या फोटोमागील व्हायरल सत्या बाहेर काढले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा आजी-नातीचा हा फोटो २००७ मधील आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार ज्यानं हा फोटो काढलाय तो अहमदाबादचा पत्रकार आहे. 12 सप्टेंबर २००७ रोजी त्याला मणिनगरच्या जीएनसी शाळेतील मुख्यध्यापिका रीटा पंड्या यांनी फोन करून विद्यार्थांचा एक इव्हेट कव्हर करण्याची विनंती केली. ज्यावेळी तो पत्रकार पोहचला त्यावेळी त्याने आजी-नातीच्या भेटीचा हा क्षण कॅमेऱ्यात टिपला.

ज्यावेळी मी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचलो त्यावेळी तिथे एकीकडे मुलं आणि दुसरीकडे वृद्धाश्रमातले ज्येष्ठ नागरीक बसले होते. मुलांनी आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र बसावं असा आग्रह त्याने धरला. लगेच सर्व मुलं उभी राहिली. पण, त्याचवेळेस एक चिमुकली वृद्धाश्रमातल्या एका महिलेकडे पाहून अचानक रडायला लागली. तीने तीच्या सख्ख्या आजीला समोर बसलेले पाहिले आणि धावत जाऊन तीने तीला मिठी मारली. आणि त्याच क्षणी मी हा भावुक क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असे तो सांगतो.