दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. नासा (नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) या अमेरिकेतील अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेने अवकाशातून भारतीय उपखंडात साजरी होणारी दिवाळीचे दृष्य टिपले आहे. असा दावा या छायचित्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे. नासाने हे छायाचित्र टिपल्याचे सांगितल्यामुळे या छायाचित्राला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळत आहे. भारतीय उपखंडातील दिवाळीच्या निमित्त दिसणाऱ्या रोषणाईच्या छायचित्र नेटीझन्स मोठ्या प्रमाणात शेअर देखील करताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये भारताच्या कानाकोपऱ्यात दिव्यांची झगमग पाहायला मिळते. तसेच या फोटोमध्ये भारताला लागून असलेल्या पाकिस्तानच्या काही भागात देखील रोषणाई दिसून येते. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्राने तुम्ही फसू नका. कारण हे छायाचित्र यंदाच्या दिवाळीचे असल्याचे सांगण्यात येत असले तरी, यामध्ये कोणतेही सत्य नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा भारतातील दिवाळीची रोषणाई दाखविणारे छायाचित्र नासाने टीपलेल नाही. तर काही वर्षापूर्वी नासाने काढलेल्या छायाचित्रामध्ये बदल करुन नेटीझन्समध्ये त्याला नव्याने दाखविण्यात येत आहे.
नासाने २०१२ मध्ये जारी केलेल्या एका अहवालानुसार, २००३ मध्ये नासाने सेटलाईटच्या माध्यमातून भारतातील दिवाळीची रोषणाई टीपली होती. या फोटोच्या साहय्याने नवीन फोटो बनविण्यात आला असून हा फोटो यंदाच्या दिवाळीतील भारतातील दृष्य असल्याचा भास निर्माण करण्यात येत आहे. नासाच्या नावाखाली मागील काही दिवाळीमध्ये देखील हे छायाचित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये लोकप्रिय असणाऱ्या फेसबुकच्या माध्यमातून ‘स्पेस वॉक’च्या लाइव्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. अनाधिकृत फेसबुक अकांऊटवरुन शेअर झालेल्या व्हिडिओला लोकप्रियता मिळाल्यानंतर नासाने कोणतेही स्पेस वॉक केले नसल्याचे समोर आले होते.
नासा (नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) ही अमेरिकेची अवकाश संशोधन करणारी जगविख्यात संस्था आहे. ही संस्था अमेरिकेची असली तरी या संस्थेसाठी भारतासहित जगभरातील शास्त्रज्ञ काम करीत असतात. नासा वेगवेगळ्या अवकाश मोहिमा राबवत असते. तसेच काही अप्रतिम छायाचित्रे देखील काढत असते. नासाने संशोधनातील फोटो पाहण्यासाठी एक विशेष अॅपदेखील उपलब्ध करुन दिले आहे.