कोणतीही अडचण आली किंवा कोणत्याही क्षणी कठीण परिस्थिती उद्भवली तरी काही जण खरोखर शांत राहून त्यावर मात करतात. बऱ्याचदा चित्रपटातील हिरोसंदर्भात अशा घटना आपल्याला पहायला मिळतात. पण कुठल्यातरी देशात प्रत्यक्षात घडलेली अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये ऑफ ड्युटी असलेल्या एका पोलिसानं हातातलं आईस्क्रीम खाली पडू न देता दोन हत्यारधारी चोरट्यांना रोखलं. याचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियातून व्हायरल झालं आहे.
नाव कळू न शकलेला एक ४६ वर्षीय पोलीस अधिकारी ड्युटीवर नसताना एका आईस्क्रीम पार्लरमध्ये आपल्या मुलासोबत एका टेबलवर बसून आईस्क्रिम खात होता. यावेळी दोन पिस्तुलधारी चोरटे त्यांचा टेबलापाशी आले. यावेळी त्या चोरट्यांना कुठलीही हालचाल करण्याची संधी न देता त्या पोलिसानं उजव्या हातानं आपल्या खिशाजवळ असलेलं पिस्तुल बाहेर आणि त्या चोरट्यांवर गोळीबार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चोरटे पळून गेले. पण आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसाच्या एका हातात पिस्तुल असताना दुसऱ्या हातात आईस्क्रीमचा कोन असताना तो त्यानं खाली पडू दिला नाही आणि नंतर ते मजेत फस्तही केलं. त्यानंतर त्यानं पोलीस कन्ट्रोल रुमला याबाबत कळवलं आणि घटनेची माहिती दिली.
ही घटना आईस्क्रीम पार्लरमधील सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली. त्यानंतर याचं फुटेज एकानं सोशल मीडियातून व्हायरलं केलं. या घटनेतील एका चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. कारण गोळीबारात त्याच्या छातीत गोळी लागली असून तो सध्या कोमात आहे, अशी माहिती टाइम्सनाउ न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात असाच एक किस्सा सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आला होता. यामध्ये एका पाच वर्षीय मुलाने आपल्या घरात शिरलेल्या चोरट्यांपासून आपल्या आईला वाचवलं होतं. या चोरट्यांकडेही शस्त्र होती. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या चिमुकल्याच्या शौर्याचं दर्शन सोशल मीडियातील व्हायरल पोस्टमधून झालं होतं.
