ब्रिटीश राजवटीमध्ये भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेल्यांना ब्रिटीशांच्या क्लबमध्ये, हॉटेलमध्ये किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी येण्यास परवानगी नव्हती. ब्रिटीश राजवटीत या सगळ्याला काही इलाज नव्हता. पण आता या जमान्यातही तुम्ही जर चुकून कधी धोतर घालून एखाद्या ठिकाणी जायचे म्हटलात तर तुम्हाला अडवले जाऊ शकते. आता हे काय नवीनच, तर हो आपण २१ व्या शतकात वावरत असतानाही कोलकात्यामध्ये एका व्यक्तीला धोतर घातल्याच्या कारणावरुन मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.
आता मॉलमध्ये प्रवेश नाकारण्याचे हेही कारण असू शकते हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे क्वीन्स मॉलमध्ये या व्यक्तीला प्रवेश नाकारण्यात आल्यावर त्यांनी इंग्रजीमध्ये तेथील सुरक्षारक्षकाशी बोलण्यास सुरुवात केली. आता ही व्यक्ती इंग्रजी बोलतेय म्हणजे चांगली शिकली-सवरलेली असावी असे वाटल्याने या सुरक्षारक्षकाने फार हुज्जत न घालता या व्यक्तीला आत जाण्यास परवानगी दिली.
याविषयी देबलिना सेन या महिलेने फेसबुक पोस्ट लिहिली असून यामध्ये तिने आपला राग व्यक्त केला आहे. अशाप्रकारे धोती किंवा लुंगीवरुन कपड्यांवरुन जर कोणाची प्रोफाईल ठरणार असेल तर हे अतिशय वाईट आहे. सेन यांनी आपल्या फेसबुक वॉलवर याविषयीचे फोटो आणि व्हिडिओही शेअर केले असून या घटनेचा त्यांनी अतिशय तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ६ तासांहून कमी वेळात १५०० जणांनी ती शेअर केली आहे. आतापर्यंत एक लाख युजर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. ही घटना घडली तेव्हा ही महिलाही त्या मॉलमध्ये उपस्थित होती. तिने या घटनेचा व्हिडिओ घेतला. मात्र तिला तेथील कर्मचाऱ्यांनी हटकले. त्यानंतर तिने घरी आल्यावर हे सगळे पोस्ट केले. या निंदनीय घटनेचा निषेध करत देबलिना यांनी मॉलवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही केले आहे.