उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर अपघात होण्याआधी ताशी २३० किमी वेगाने कार पळवणाऱ्या मित्रांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मित्र वेगाने कार पळवत असताना एकजण ‘चल मरेंगे’ असं म्हणत असल्याचंही व्हिडीओत ऐकू येत आहे. कारमध्ये असताना तो लाईव्ह स्ट्रिमिंग करत होता. दुर्दैवाने त्याच्या तोंडून निघालेले शब्द खरे ठरले आणि चौघाही मित्रांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. शुक्रवारी ही घडना घडली.

अपघातात मृत पावलेले तरुण बीएमडब्ल्यू कारमधून प्रवास करत होते. हायेववर पोहोचल्यानंतर ते तब्बल ताशीच ३०० किमीच्या वेगाने कार पळवत होते. याचवेळी समोरुन येणाऱ्या कंटेनरला कारने धडक दिली आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे मित्र सुल्तानपूर येथून दिल्लीला चालले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी वैद्यकीय विद्यालयात प्राध्यापक असणारा आनंद प्रकाश गाडी चालवत होता. यावेळी गाडीत बसलेला दुसरा मित्र त्याला ३०० च्या वेगाने गाडी चालव सांगत होता. लाईव्ह केलेल्या या व्हिडीओत तो ‘चलो मरेंगे’ असं सांगताना ऐकू येत आहे.

आनंद प्रकाशने यावेळी सर्वांना सीटबेल्ट लावण्यास सांगितलं आणि एकदा रस्ता मोकळा दिसला तर वेग वाढवू असं सांगितलं. गाडीमध्ये चालकाच्या शेजारी पेयाच्या बाटल्या दिसत आहे. पण त्यांच्यातील कोणीही मद्याचं प्राशन केलं होतं का याची माहिती मिळालेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघात इतका भीषण होता की, कारचं इंजिन आणि चौघे तरुण अपघातानंतर काही अंतरावर फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. आनंद प्रकाश, अखिलेश सिंग, दीपक कुमार आणि मुकेश असी मृतांची नावं आहेत. अपघातानंतर कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार असून पोलीस शोध घेत आहेत.