चोरी करण्यासाठी चोर किती शक्कल लढवतील याचा काही नेम नाही. सोशल मीडियामुळे असे मजेशीर किस्से आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात. तर सध्या कोईंबतूरमधला एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दुकानाबाहेरील बल्ब चोरण्यासाठी चोरानं नामी शक्कल लढवली आहे. चोरी करताना पकडले जाऊ नये यासाठी या व्यक्तीनं दुकानाबाहेर उभं राहून कवायत करायला सुरूवात केली. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांना हा व्यक्ती व्यायाम करत असल्याचं वाटत होतं त्यामुळे अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र कवायत करण्याच्या बाहाण्यानं तो दुकानाबाहेरील बल्ब चोरून ते खिशात लपवत होता. पहाटे पाचच्या सुमारास ही चोरी घडली.

सकाळच्या सुमारास कदाचित व्यायाम करायला आलेला एखादा स्थानिक असावा असं वाटल्यानं अनेकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र तो व्यायाम करण्याच्या बाहण्यानं चोरी करत होता हे मात्र अनेकांच्या नजरेस पडलं नाही. दुकानाबाहेर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरात हे दृश्य कैद झालं आहे. या चोरीचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.