अनेकांना व्यायाम करायचा म्हटला की कंटाळा येतो. सुरूवातीला अनेकजण मोठ्या उत्साहात व्यायामशाळेत दाखल होतात. मात्र, थोड्याच दिवसांमध्ये हा उत्साह थंडावतो. परंतु, व्यायामशाळेत तुमचा कुणी पार्टनर असेल तर दररोज व्यायाम करण्याचा तितकासा कंटाळा येत नाही. एकमेकांशी गप्पा मारत किंवा कंटाळा आल्यानंतर एकमेकांना चिअर-अप करत व्यायाम करणे तुलनेने सोपे असते. हा आता पार्टनर म्हटल्यावर साहजिकच अनेकांना मित्र किंवा मैत्रीण वाटू शकते. मात्र, एखादा कुत्रा व्यायामशाळेत तुमचा पार्टनर झाला तर? तुम्हाला यामध्ये अतिशयोक्ती वाटेल. पण हे खरंच शक्य आहे.
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हाला याची प्रचिती येईल. या व्हिडिओत मालकीण आणि तिचा कुत्रा एकमेकांशी उत्तमप्रकारे समन्वय साधताना व्यायाम करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे काही व्यायामप्रकार करण्यात हा कुत्रा आपल्या मालकीणीला अतिशय चांगल्या पद्धतीने मदतही करत आहे. यामध्ये योग करण्यासाठी चटई आणण्यापासून ते सर्व व्यायामप्रकार कुत्रा सराईतपणे करत आहे. हा व्हिडीओ पाहतानाही खूप मजा येते कारण कुत्रा आपल्या मालकीणीप्रमाणे प्रत्येक स्टेप अतिशय योग्य पद्धतीने करत असल्याचे यामध्ये दिसते.