रेल्वे ट्रॅकवरच आपत्कालीन लॅण्डींग केलेल्या एका छोट्या विमानातील जखमी पायलटचा जीव पोलिसांनी वाचवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातग्रस्त विमानाला ट्रेन धडक देण्याच्या काही सेकंद आधी पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्या घालून या पायलटचे प्राण वाचवल्याचा थरार कॅमेरात कैद झालाय.
हा सर्व धक्कादायक प्रकार अमेरिकेमधील लॉस एंजेलिसमध्ये घडला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कपड्यांवर असणाऱ्या बॉडीकॅममध्ये हा सर्व प्रकार रेकॉर्ड झालाय. या व्हिडीओमध्ये एक पोलीस कर्मचारी अपघातग्रस्त विमानाच्या कॉकपीटमधून जखमी पायलटला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. अपघातग्रस्त विमानाच्या पायलटच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याच्या चेहऱ्यावर रक्त असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतंय.
नक्की पाहा हा व्हिडीओ >> काळजाचा धोका चुकवणारा Video: घाटात वळताना कठडा तोडून अधांतरी लटकला ट्रक; त्यानंतर काय झालं पाहा…
रेल्वे रुळावरच इमरजन्सी लॅण्डींग केलेल्या या या विमानाच्या कॉकपीटमधील सीट बेल्ट काढून पायलटला मोकळं केल्यानंतर पोलीस अधिकारी या पायलटला लवकर तिथून निघण्यासाठी ‘गो… गो… गो..’ असं ओरडून सांगताना दिसतोय.
भरधाव वेगाने येणारी ट्रेन ट्रॅकवरील या अपघातग्रस्त विमानाचा चुरडा करण्याच्या काही सेकंद आधीच हे दोन्ही पोलीस कर्मचारी या जखमी पायलटला विमानामधून बाहेर काढून रेल्वे रुळांपासून खेचून दूर नेतात. हे लोक ट्रॅकपासून थोडे दूर आल्यानंतर ट्रेन हॉर्न वाजवत येते आणि त्या विमानाच्या अवशेषांना उडवून निघून जाते.
काही क्षणांचा उशीर झाला असता तरी या पायलटचे प्राण गेले असते. या पोलिसांनी दाखवलेलं प्रसंगावधान आणि केलेली मदत यामुळे या व्यक्तीचा प्राण वाचल्यामुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होतोय. समोर आलेल्या माहितीनुसार उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांमध्येच या छोट्या खासगी विमानाचा अपघात झाला होता.