देशामधील करोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच पूर्वेकडील पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना अम्फन चक्रीवादळाचा फटका बसला आहे. अशातच महाराष्ट्राच्या उत्तरेकडील काही भागांबरोबरच शेजारच्या मध्य प्रदेश, गुजरातसहीत उत्तरेकडील राज्यांनाही आणखीन एका नैसर्गिक संकटाला तोंड द्यावं लागत आहे. हे संकट आहे टोळधाडीचं. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील अनेक भागांमध्ये टोळधाड पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मागील एका आठवड्यापासून अनेक राज्यांमधील शेतमालावर सातत्याने टोळीधाडी पडत आहेत. या टोळांनी ५० हजार हेक्टवरील शेतमालाचे नुकसान केल्याचे सांगण्यात येत आहे.

शेतांवर मोठ्या संख्येने टोळधाडी पडताना पाहून सुरुवातील शेतकरी गोंधळल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. त्यानंतर टोळांना पळवून लावण्यासाठी आणि पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी वाजवून आवाज करण्यास सुरुवात केली. काहींनी मशाली पेटवून शेतामध्ये धाव घेत पिकं वाचवण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी चक्क शेतांमध्ये डीजे लावले आहेत. उत्तर प्रदेशमधील एका पोलीस अधिकाऱ्याने टोळांना पळवून लावण्यासाठी शेतामध्ये लावलेल्या डीजे ट्रॉलीचा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शेताच्या मध्यभागी असणाऱ्या रस्त्यावर डीजे स्पीकर्स आणि भोंगे लावल्याचे दिसत आहे. “डीजे केवळ नाचण्यासाठी नाही तर टोळांना पळवून लावण्यासाठीही वापरला जातो. तोंडाने आवाज काढून किंवा थाळ्या वाजवूनही टोळांना पळवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” अशी कॅप्शन उत्तर प्रदेशमधील पोलीस अधिकारी असणाऱ्या राहुल श्रीवास्तव यांनी व्हिडिओ शेअर करताना दिली आहे.

नाकतोड्यासारखे दिसणारे टोळ हे मोठ्या प्रमणात शेतमालाचं नुकसान करतात. टोळांचा एक छोटा समुह अडीच हजार लोकं खाऊ शकतील एवढं एकावेळी खाऊ शकतो. त्यामुळेच लोकं मिळेल त्या गोष्टी वाजवून या टोळांना शेतमालापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी तर शहरी भागामध्येही टोळधाडी पडल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. जयपूरमध्ये तीन दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने टोळ दिसलेले.

भांडी, ढोल वाजवून टोळांना घाबरवून पळवून लावता येतं. टोळांना पळवून लावण्यासाठी काही रसायने फवारणीही करता येते. मात्र या टोळधाडींमुळे शेतमालाला मोठं नुकसान होऊ शकतं हे लक्षात ठेवलं पाहिजे, असं कृषीतज्ज्ञ जैनेंद्र कानाउजा यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या टोळधाडींवर उपाययोजना करण्यासंदर्भात अनेक राज्यांमधील कृषी खात्यांचे अधिकारी वेगवेगळ्या उपययोजना करत आहेत. यामध्ये अगदी औषध फवारणीपासून ते लोकांमध्ये यासंदर्भात जागृती निर्माण करण्याचे कामही केले जात आहे. या संकटापासून वाचण्यासाठी केंद्राने याबद्दल ठोस उपाययोजना कराव्यात अशीही मागणी केली जात आहे.