देश खूप प्रगत झाला आहे, कोरोना संकटात भारताने मोठी वैद्यकीय व्यवस्था उभारली, अशी मोठमोठी भाषणं तुम्ही टीव्हीवर पाहिली असतील. पण आम्ही आज तुम्हाला जी बातमी सांगणार आहोत ती काळीज पिळवटून टाकणारी आहे. एकीकडे भारतात वैद्यकीय व्यवस्थेचे गोडवे गायले जातात. तर दुसरीकडे गाव पातळीवर मात्र भलतीच काहीतरी व्यवस्था दिसून येत आहे. कदाचित यंत्रणा खरंच उभी होतही असेल. पण काही ठिकाण याबाबत अपवाद असतील. अशीच अपवाद असलेली जागा म्हणजे मध्य प्रदेशमधला देवासा जिल्ह्यातील सतवास आरोग्य केंद्र होय. वेगवेगळ्या हत्याकांडच्या घटनांनी चर्चेत येणारं मध्य प्रदेश पुन्हा एकदा काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे चर्चेत आलंय. रूग्णवाहिका मिळाली नाही म्हणून एका हतबल पित्याने आपल्या मुलीला एका बाईकवर खाट बांधून त्यावर मुलीला ठेवून कसंबसं आरोग्य केंद्र गाठलंय. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. या व्हिडीओनं आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका बाईकवर खांट बांधण्यात आलेली आहे. त्यावर एक मुलगी झोपलेली दिसून येतेय. ही १९ वर्षीय मुलगी दीड वर्षापूर्वी घराबाहेर असलेल्या एका खड्ड्यात पडली होती. तेव्हापासून तिच्या कमरेखालचा भाग निकामी झालाय. खातेगांव तहसीलमधल्या मिर्जापुरमध्ये राहत असलेले वडील कैलाश आपल्या १९ वर्षीय मुलीला तिच्यावरील उपचारासाठी नेहमीच सतवास आरोग्य केंद्रात नेत असतात. गेल्या शनिवारी ते आपल्या मुलीला उपचारासाठी आरोग्य केंद्रात नेत असताना हा व्हिडीओ शूट करण्यात आलाय. या व्हिडीओमधून एका चार पायांच्या खाटावरील आरोग्य व्यवस्था पाहून सोशल मीडियावर हा व्हिडीओ अगदी आगीसारखा पसरू लागला आहे.

गेल्या शनिवारी जेव्हा वडील कैलाश आपल्या विकलांग मुलीला उपचारासाठी आरोग्य केंद्रात नेण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी रूग्णवाहिकेशी संपर्क साधला होता. पण त्यावेळी त्यांना कोणतीही रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अशा परिस्थितीत एखाद्या चार चाकी गाडीने मुलीला आरोग्य केंद्रात नेण्यासाठी त्यांना एक ते दीड हजार रूपयांपर्यंत खर्च आला असता. आपल्या विकलांग मुलीच्या उपचारासाठी आधीच वडील कैलाश यांनी तीन लाखांचं कर्ज घेतलं आहे. अशा परिस्थितीत हा खर्च त्यांच्या खिशाला परवडणारा नव्हता. म्हणून वडील कैलाश यांनी आपल्या बाईकवर खांट बांधून त्यावरून मुलीला आरोग्य केंद्रात आणलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ व्हायरल नंतर आरोग्य विभागात हालचालींना सुरूवात
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागात हालचालींना सुरूवात झाली. सीएमएचओ डॉ. एमपी शर्मा यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. यावेळी ते म्हणाले, “वडील कैलाश अनेकदा आपल्या मुलीवर उपचार घेण्यासाठी आरोग्य केंद्रात येतात. यापूर्वी त्यांनी मुलीला रुग्णवाहिकेतूनच उपचारासाठी आणले होते, पण त्या दिवशी त्यांना रुग्णवाहिका का मिळू शकली नाही, याची चौकशी केली जाईल. आमची टीम मिर्झापूरला जाऊन त्यांना योग्य उपचार देईल.” असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं.