अनेक देशांमध्ये खेकडा हे अगदी सामान्य खाद्य आहे. चीनमध्ये तर खेकडा अतिशय आवडीने खाल्ला जातो. याठिकाणी खेकड्याचे विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ तयार केले जातात. दक्षिण चीनमधील चांग्शा शहरामध्ये असाच खेकड्याचा पदार्थ तयार करत असताना काय झाले हे पाहिल्यास तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. एका भुकेल्या खेकड्याची ही करामत पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.

खेकड्याचा पदार्थ तयार करण्याच्या तयारीत एका व्यक्तीने तव्यावर काही पदार्थ टाकले. त्यानंतर या व्यक्तीने तव्यावर खेकडाही टाकला. आणि पुढची गंमत ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. भुकेल्या या खेकड्याने तव्यावर टाकलेले पदार्थ थेट खायलाच सुरुवात केली. आता खेकड्याने असे करायला सुरुवात केल्यामुळे त्याचा तव्यावर पदार्थ खाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ३४ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये खेकडा कशाप्रकारे हे पदार्थ खातो ते दिसत आहे. तव्यावर गरम तेलात या खेकड्याला टाकले असतानाही तो आपल्या नांग्यांनी पदार्थ तोडून ते खात असल्याचे दिसते.

यू ट्युबवर या व्हिडिओला अतिशय कमी वेळात ४७ हजार व्ह्यू मिळाले आहेत. आता हा व्हिडिओ जास्त प्रमाणात पाहिला जात असल्याचे खरे असले तरीही मात्र तुम्ही एखादा प्राणी खात असाल तर त्याला लगेच मारा आणि खा. त्याचा जीव असा तडफडू देऊ नका. ही अतिशय क्रूर गोष्ट आहे. अशा प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.