लग्न म्हणजे काय? या प्रश्नावर प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो. खरं तर कोणत्याही नात्याची अशी काही विशिष्ट व्याख्या सांगता येणार नाही. मात्र याच लग्न म्हणजे काय प्रश्नाला तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. या उत्तरपत्रिकेमध्ये अगदीच उपहात्मक वाटावं अशापद्धतीने लिहिलेल्या उत्तराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा >> Split AC देतो सांगून हॉटेल मालकाने भिंतीत भगदाड पाडून दिला ‘दोघांत एक’ एसी; मुंबईमधील फोटो ठरतोय ‘राष्ट्रीय चर्चेचा विषय’

सोशल स्टडीज विषयाअंतर्गत तिसरीच्या मुलांना लग्न म्हणजे काय असा प्रश्न विचारण्यात आलेला. तिसऱ्या इयत्तेमधील क तुकडीत असणाऱ्या १४ रोल नंबर असणाऱ्या विद्यार्थ्याने या प्रश्नाला दिलेल्या उत्तराला शिक्षकाने शून्य गुण दिले आहेत. इतकचं नाही तर या विद्यार्थ्याने आपली भेट घ्यावी असा शेराही तापसणाऱ्याने दिला आहे. आता एवढं सविस्तर उत्तर देऊन थेट १० पैकी शून्य गुण देण्याचं कारण काय असं विचारलं तर ते कारण आहे या उत्तरामधील मजकूर. विशेष म्हणजे या उत्तरात मुलं जन्माला घालण्याचं कारण तर फारच विचित्र शब्दांमध्ये सांगण्यात आलं आहे. या विद्यार्थ्याने काय उत्तर दिलंय पाहूयात…

ज्यावेळी मुलीचे पालक तिला, तू आता एक महिला असून यापुढे आम्ही तुला खाऊ घालू शकत नाही. जा आणि असा पुरुष शोध की जो तुला खाऊ घालेल, असं सांगतात त्यावेळेस मुलगी लग्न करते. ती अशा एका पुरुषाला शोधते ज्याला त्याचे पालक सातत्याने लग्न करं म्हणून ओरडत असतात आणि आता तरी पुरुषासारखा वाग असं सांगत असतात.

त्यानंतर दोघेही एकमेकांची चाचणी घेतात आणि आनंदाने एकमेकांचा स्वीकार करतात. नंतर ते सुखाने राहू लागतात. काहीतरी आलतू फालतू गोष्ट करायची म्हणून मुलं जन्माला घालतात.

हा फोटो तुफान व्हायरल झाला असून अडीच हजारांहून अधिक वेळा या उत्तराचा फोटो रिट्वीट करत शेअर करण्यात आला आहे.

तपासणाऱ्याने हे उत्तर म्हणजे ‘नॉनसेन्स’ असल्याचा शेराही दिला आहे.

अनेकांनी तिसरीच्या मुलांना लग्न म्हणजे काय असा प्रश्न कोणत्या परिक्षेत विचारला जातो असं म्हणत मूळ चूक प्रश्न विचारणाऱ्यांचीच आहे असं म्हटलं आहे.