काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून हद्दपार केल्यानंतर चलनात आलेली दोन हजाराची नवी नोट त्रासदायक ठरत असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. पाचशे आणि हजारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँक आणि टपाल कार्यालयात लांब रांगामुळे जनता त्रस्त असताना सरकारने व्यवहारात आणलेल्या दोन हजारच्या नोटेमुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. आपल्याकडील जुन्या नोटांच्या बदलात मिळणाऱ्या दोन हजार रुपयांची नोटतून सुट्टे पैसे कसे करायचे या समस्येत दोन हजारची नोट खराब निघाली तर ती बदलण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागू शकते.
‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार, निशाद हुसेन जाफरी या मुंबईतील व्यक्तीला दोन हजारच्या फाटक्या नोटामुळे त्रास सहन करावा लागल्याचे समोर आले आहे. शनिवारी जफारी यांनी बँकेतून नोटा बदलून घेतल्यानंतर त्यांना दोन हजारची फाटलेली नोट मिळाली होती. जुन्या नोटा बदली करुन घेण्यासाठी जफारी यांना आठ तास रांगेत उभे रहावे लागले होते. वरळीमध्ये चावी बनविण्याचा व्यवसाय करणाऱ्या जाफरी त्यांच्या पत्नीवर मुझफ्फरनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासाठी पाच हजार रुपये खर्च आहे. पत्नीवर उपचारांसाठी घरी पैसे पाठविण्यासाठी त्यांनी बँकेबाहेर आठ तास प्रतिक्षा केली.
एवढा वेळ प्रतिक्षा केल्यानंतर दोन हजाराच्या मर्यादेमुळे त्यांना पाच हजार रुपयाची रक्कम घरी पाठविणे अशक्य झाले. पाच हजार रुपयांची भर करण्यासाठी त्यांनी वरळीतील आयडीबीआय आणि इंडियन ओव्हरसीज बँकेतून नोटा बदली करुन घेतल्या. कसरत करुन चार हजार रुपये मिळविल्यानंतर यातही दोन हजाराची नोट खराब निघाली. ही फाटलेली नोट बदलण्यासाठी गर्दीचे कारण देत बँकेमध्ये त्यांना नकार देण्यात आला. तसेच नवीन चलनात आलेल्या नोटेच्या बदलीबाबत प्रक्रियेची सूचना नसल्याचेही सांगण्यात आले. पोस्ट कार्यालय किंवा बँकेमध्ये फाटलेली नोट बदलून मिळत नसल्याचे सांगताना बँकेतील कर्मचाऱ्यांनी रिझर्व्ह बँतकेत जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती त्यांनी या वृत्तपत्राला दिली. बँकेतील रक्कम काढण्याच्या मर्यादेनंतर नवीन नोट खराब निघाल्यास ती बदलून घेण्यासाठी नागरिकांना नवीन समस्या निर्माण होत असल्याचे दिसत आहे