इंटरनेटवरील माहितीचा सर्वात मोठा भंडार म्हणजे Wikipedia. अगदी शालेय किंवा कॉलेजमधील प्रोजेक्टसाठी लागणारी माहिती असो किंवा ऑफिसमधील एखाद्या प्रेझेंटेशनसाठी लागणारी माहिती असो विकीपीडियाला पर्याय नाही. अगदी कोणतीही माहिती विकीपीडियावर सहज आणि सोप्या भाषेत विस्तृतपणे उपलब्ध असते. अनेकदा एका गुगल सर्चवर सर्वात आधी Wikipedia पेजेसचा संदर्भ दिला जातो. मात्र इंटरनेटवरील मोफत माहितीचा सर्वात मोठा भंडार आता भारतीयांसाठी बंद होण्याची शक्यता आहे.
विकीपीडिया ही वेबसाईट विकीमीडिया फाऊंडेशनच्या अंतर्गत चालवली जाते. या कंपनीच्या भारतातील संवाद संचालक अनुशा अलिखान यांनी भारतात विकीपीडिया वेबसाईट बंद करण्याची शक्यता वर्तवली आहे. बिझनेस इन्सायडरला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या,
“Wikipediaचा ढाचा हा भाषा आणि विषय केंद्रित आहे. कुठल्याही भौगोलिक रचनेवर आधारीत नाही. त्यामुळे जगातील कुठल्याही व्यक्तीला कुठूनही या वेबसाईटवरील माहिती एडिट करता येते. मात्र ही सोय कदाचित भारतातील काही लोकांना मान्य नाही. परिणामी विकीपीडियावरील माहिती बाबत ते वारंवार विरोध दर्शवतात. तसेच माहिती एडिट करण्याची सोय बंद करावी अशीही मागणी ही मंडळी करतात. मात्र केवळ भारतीयांसाठी एडिट करण्याची सोय बंद करता येणार नाही. यापेक्षा भारतात विकीपीडिया बंद करणं जास्त सोयीस्कर ठरेल. किंबहून येत्या काळात कंपनी विकीपीडिया भारतात बंद देखील करु शकते.” अशा शब्दात अनुशा अलिखान यांनी वेबसाईट बंद होण्याचे कारण सांगितले.