Woman Post Viral चेन्नईतल्या एका महिलेने LinkedIn वर एक पोस्ट केली आहे. ट्रॅफिक पोलिसाच्या समोरच आपल्याला कसं रडू आलं, नेमकं काय घडलं ते तिने सांगितलं आहे. या महिलेची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. एका महिलेने तिला आलेला कामाचा ताण, तिला सहन कराव्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टींबाबत भाष्य केलं आहे. सोशल मीडियावरची तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे. जनानी पोरकोडी असं या महिलेचं नाव आहे.
काय म्हटलं आहे महिलेने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये?
“मागच्या आठवड्यात मी वाहतूक पोलिसाच्या समोरच रडू लागले. मी कार चालवत होते. मात्र माझ्यावर माझ्या कामाचा प्रचंड तणाव होता. जे काही मी सहन करत होते त्यामुळे मी आतून वेदनाच सहन करत होते. कामाचा प्रचंड ताण, माझ्याकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा हा सगळा त्रास माझ्या चेहऱ्यावर दिसत होता. ” असं या महिलेने म्हटलं आहे.
मला वाहतूक पोलिसाने थांबवलं आणि…
पुढे ही महिला तिच्या पोस्टमध्ये म्हणते, “मी कार चालवत होते तेव्हा मला वाहतूक पोलिसाने थांबवलं. त्याने मला का थांबवलं ते कारण मला आठवत नाही. मात्र त्या पोलिसाने मला विचारलं की काय घडलं आहे तुम्ही बऱ्या आहात ना?, त्या पोलिसाने माणुसकीने आणि काळजीने विचारलेल्या प्रश्नामुळे मला रडायलाच येऊ लागलं. त्यानंतर मी माझ्या अश्रूंना वाट करुन दिली आणि मनसोक्त रडले. त्यावेळी ट्रॅफिक पोलिसाने दाखवलेली माणुसकी मला विसरता येणार नाही. कैक आठवड्यांपासून मला रडायचं होतं. पण रडायलाही वेळ मिळाला नव्हता. आश्चर्याची बाब म्हणजे त्यानंतर मला खरंच हलकं वाटू लागलं. सध्या मी व्यवस्थित आहे. पण त्या एका प्रसंगाने मला शिकवलं की आपण कितीही सशक्त आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही आपण आतून तुटत असतो. त्यावेळी व्यक्त व्हायला हवं. ” जनानी पोरकोडी असं या महिलेचं नाव आहे.
जनानीच्या पोस्टवर अनेक कमेंट
जनानीच्या भावनिक पोस्टनंतर अनेक लोक या पोस्टवर व्यक्त होत आहेत. कधी कधी अशी भावनिक कोंडी फुटणं हे खूप आवश्यक असतं. दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की तुला फक्त कशी आहेस हे विचारलं गेलं आणि तुझ्या डोळ्यांत अश्रू आले. तुझ्या मनात किती वेदना साठल्या होत्या तू विचार कर. बरं झालं तू रडलीस. एखाद्याने बरी आहेस का हे विचारणंही किती आवश्यक झालंय हल्ली. असं आणखी एका युजरने म्हटलं आहे. लोक या पोस्टवर व्यक्त होत आहेत.