महिलांची सुरक्षा हा कायमच चर्चेत राहणारा विषय आहे. मात्र आता या विषयामध्येही घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणार दुजाभाव यासारख्या गोष्टींबरोबरच डिजिटल सुरक्षेचा मुद्दाही नव्याने अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. खास करुन महिलांची खासगी माहिती चोरण्याचे प्रकार आणि त्यामधून त्यांना त्रास देण्याच्या घटना वाढताना दिसत आहे. अशावेळी महिलांनीच जास्त सावधान राहण्याची गरज आहे. महिला सावध राहिल्यास आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवल्यास अनेक गैरप्रकार थांबवणे सहज शक्य आहे. असाच एक अनुभव एका महिलेने ट्विटरवर शेअर केला असून साधा लॅपटॉप ठिक करण्यासाठी येणारा माणूसही कशाप्रकारे महिलांच्या क्रमांकाचा गैरवापर करतात हे या घटनेतून दिसून आलं आहे.

ट्विटरवरील @Chivas_Desi नावाने अकाऊंट असणाऱ्या तरुणीने तिला आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. किरण असं प्रोफाइल नेम असणाऱ्या या तरुणीने काही ट्विट्स केले आहेत. यामध्ये तिने कोणत्याही तरुणीने त्यांच्या आयुष्यातील अगदी जवळचे काही पुरुष वगळता इतर कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेऊ नये असं सांगितलं आहे. तसेच आपल्याला असं का वाटतं यासंदर्भात तिने स्वत:चा एक कटू अनुभवही सांगितला आहे.

एका नामांकित कंपनीचा इंजिनियर या तरुणीच्या घरी लॅपटॉप दुरुस्त करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने स्वत:च्या मोबाइलमधील फोटो गॅलरी या तरुणीसमोर चुकून ओपन केली. मात्र त्या फोटोगॅलरीमध्ये या तरुणीला तिने ठेवलेले व्हॉट्सअप डिपी दिला आणि तिला धक्काच बसला. या व्यक्तीने या महिलेचा व्हॉट्सअप डिपी सेव्ह केल्याचे तिच्या लक्षात आले.

मी त्याला रंगेहाथ पकडलं आणि त्याला तो फोटो डिलिट करण्यास सांगितलं. सुरुवातील त्याने आपण फोटो सेव्ह केला नसल्याचा दावा केला. त्यानंतर त्याने माफी मागण्यास सुरुवात करत या संदर्भात कंपनीकडे तक्रार करु नये अशी विनंती केली. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये आपल्याला नोकरी नव्हती त्यामुळे तक्रार केल्यास आपल्या नोकरीवर गदा येईल असं या इंजिनियरने सांगितल्याचा दावा पुढच्या ट्विटमध्ये या तरुणीने केला आहे.

“माझा व्हॉट्सअप डिपी केवळ मी क्रमांक सेव्ह केलेल्या लोकांना दिसतो. मात्र या इंजिनियरचा क्रमांक सेव्ह केलेला नव्हता. तरी त्याने मला लोकेशन सेण्ड करण्याची विनंती केल्याने मी त्याचा क्रमांक सेव्ह केला लोकेशन पाठवली आणि त्यानंतर क्रमांक डिलीट केला. अगदी एका मिनिटाच्या कालावधीमध्ये मी क्रमांक डिलीट केला. त्या काळात या इंजिनियरने माझा क्रमांक सेव्ह केला,” असं पुढच्या ट्विटमध्ये किरण म्हणते.

“भेटणाऱ्या प्रत्येक महिलेबरोबर आपण कसंही वागू शकतो असं भारतीय पुरुषांना का वाटतं? मला या प्रकरणामुळे खासगी माहितीसंदर्भातील सुरक्षेबद्दल आता अधिक भीती वाटू लागली नाही. माझ्याबरोबरच इतर अनेक महिलांना अशी माणसं त्यांचे फोटो परवानगी शिवाय सेव्ह करतात हे ठाऊक नसते. त्यांच्यासठी अधिक काळजी वाटतेय,” असं शेवटच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या प्रकरणाच्या माध्यमातून किरणने इतर महिलांना सजग राहण्याचा सल्ला दिला आहे.