Woman Hanging From Hair In London Metro Viral Video :  मेट्रोसंबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ फार मजेशीर, तर काही फारच विचित्र असतात. अनेकदा व्हायरल होण्यासाठी लोक मेट्रोमध्ये असे काही विचित्र प्रकार करीत असतात की, ते पाहून चकित व्हायला होते. सध्या मेट्रोतील असाच एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी मेट्रोमध्ये बसण्यास जागा न मिळाल्याने विचित्र अन् भयानक वाटेल असा एक जुगाड करताना दिसली. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला.

ट्रेन किंवा मेट्रोमध्ये बसण्यास सीट न मिळाल्यास लोक वेगवेगवेगळे जुगाड करताना दिसतात. पण, या तरुणीने केलेला जुगाड मात्र फारच भयानक आहे. कारण- ही तरुणी चक्क हँडलवर आपल्या केसांद्वारे लटकून हवेत झुलत प्रवास करतेय. ती हा सर्व जीवघेणा प्रकार प्रसिद्धी मिळविण्यासाठी करीत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी मेट्रोमध्ये चढते; पण ती मेट्रोमध्ये चढल्यानंतर उभे राहून किंवा सीटवर बसून नाही, तर चक्क उभे राहण्यासाठी असलेल्या हँडलला केसांद्वारे लटकून प्रवास करतेय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे कसे शक्य आहे? पण, ते शक्य करण्यासाठी तिने केसांचा गच्च अंबाडा बांधला आहे आणि या अंबाड्यावर तिने काही हुक अडकवलेत. मग हे हुक तिने नंतर ट्रेनमध्ये पकडून उभे राहण्यासाठी असलेल्या हँडलवर अडकवलेत. अशा प्रकारे ती स्वत:च्या केसांच्या मदतीने हवेत लटकत प्रवास करतेय.

त्या महिलेच्या अशा जीवघेण्या जुगाडामुळे तिच्या केसांवर किती भार आला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. पण, व्हिडीओसाठी ती आपल्या वेदना लपवीत केसांना लटकून मोबाईल वापरताना दिसतेय. जर चुकून अंबाडा सुटला, तर ती जोरात खाली पडू शकते याचीही तिला अजिबात भीती नाही. तरुणीचा हा ‘प्रताप’ पाहून तिथे बसलेले प्रवासीदेखील आश्चर्यचकित झाल्याचे दिसतेय.

तरुणीच्या मेट्रो प्रवासाचा हा विचित्र व्हिडीओ @viperscales नावाच्या एक्स युजरने पोस्ट केला आहे, जो आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकाने लिहिले की, “तिचं डोकं दुखत नसेल का?” दुसऱ्याने लिहिले, “व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करतात.”