भीषण आगीच्या वणव्यात ऑस्ट्रेलिया होरपळला आहे. न्यू साऊथ वेल्सच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे जवळपास ४८ कोटी प्राणी आणि पक्षी यांना जीव गमावावा लागला. न्यू साऊथ वेल्स या राज्याला या वणव्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियातील खुरटय़ा जंगलांमध्ये लागलेल्या आगींचे विक्राळ वणवे बनले असून, व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स या राज्यांमध्ये या वणव्यांनी हाहाकार उडवून दिला आहे. ‘बुशफायर’ असे या वणव्यांचे नामकरण करण्यात आलं आहे. हे वणवे काबूत आणण्यासाठी ऑस्ट्रेलियातील सर्व थरांतील सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संघटना, अग्निशमन आणि वनवणवे तज्ज्ञ कामाला लागले आहेत. परिस्थितीवर अजूनही म्हणावे तसे नियंत्रण मिळवता येऊ शकलेले नाही. परंतु सोमवारी या भागांमध्ये पडलेल्या पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र आता वणव्याच्या तडाख्यातून वाचलेल्या जंगलांचे संवर्धन करण्यासाठी आणि प्राण्यांना वाचवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. हेच लक्षात घेऊन एका मॉडलने अगदीच आगळ्यावेगळ्या पद्धतीने साडेतीन कोटींचा मदतनिधी गोळा केला आहे.
कोण आहे ही तरुणी?
अमेरिकन मॉडल असणाऱ्या २० वर्षीय केलीन वॉर्ड या तरुणीने इन्स्टाग्रामवरुन ऑस्ट्रेलियातील वणव्यांचा फटका बसलेल्या जंगलांना आणि प्राण्यांना वाचवण्यासाठी आवाहन केलं होतं. विशेष म्हणजे आपल्या मदतनिधीसाठी देणगी देणाऱ्या प्रत्येकाला आपण एक न्यूड सेल्फी पाठवू असं केलीननं स्पष्ट केलं होतं. इन्स्ताग्रमावर आपली ओळख मॉडेल आणि ऑलाइन सेक्स वर्कर सांगणाऱ्या केलीनने इन्स्ताग्रामवर ऑस्ट्रेलियातील वणव्याचे फोटो पाहिल्यानंतर मदतनिधी उभारण्याचा निर्णय घेतला.
केलीनने काय पोस्ट केलं?
केलीनने ३ जानेवारी रोजी एक ट्विट केले. “या मदतनिधीसाठी तुम्ही १० डॉलर किंवा त्यापैकी अधिक मदत केल्यास मी तुम्हाला पर्सनल मेसेजवर माझा न्यूड फोटो पाठवेल. पण देणगी दिल्याचा पुरावा तुम्हाला आधी मला पर्सनल मेसेजवर पाठवावा लागेल,” असं केलीनने ट्विटमध्ये म्हटलं होतं. अशीच एक पोस्ट तिने इन्स्ताग्रमावरही केली होती.
इतका प्रतिसाद मिळाला की…
काही हजार डॉलर मदतनिधी उभारण्याच्या हेतूने केलीनने केलेल्या या पोस्टवरुन तिला हजारोच्या संख्येने पर्सनल मेसेजेस आले. हा आकडा इतका होता की केलीनला अखेर काही जणांना हे मेसेजेस पाण्यासाठी कामावर ठेवावे लागले. देणगी दिल्याची पावती पाठवणाऱ्यांना केलीनने आपले न्यूड फोटो पाठवले. २४ तासांमध्ये या मोहिमेमधून पाच लाख डॉलर (म्हणजेच साडेतीन कोटी रुपये) जमा केले.
तरी तिच्यावर कारवाई झाली…
मात्र हा सर्व प्रकार व्हायरल झाल्यानंतर इन्स्ताग्रामने केलीनचे अकाऊंट बंद केले. नियमांचे उल्लंघन करुन अश्लील फोटो पोस्ट केल्याचे कारण देत केलीनचे अकाऊंट बंद करण्यात आलं. मात्र अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन केलीनचे कौतुक केलं आहे. केलीनने ऑस्ट्रेलियन सरकारपेक्षा अधिक मदत केल्याचे मतही काहींनी नोंदवलं आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये हाहाकार…
वणव्याचा सर्वाधिक फटका बसलेले न्यू साऊथ वेल्स हे ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्येचे सधन राज्य आहे. या राज्यातील जवळपास ४० हजार चौरस किलोमीटर टापू वणव्यांनी व्यापला आहे. जवळपास १३०० घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून १५ जणांचा मृत्यू झाला. लाखो झाडे आणि प्राणी जळून खाक झाले आहेत. ऑस्ट्रेलियात सहसा अशा आगी तेथील उन्हाळ्याच्या सुरुवातीला- म्हणजे ऑक्टोबरच्या सुमारास सुरू होतात. परंतु २०१९ च्या जुलै महिन्यातच यंदा वणव्याच्या आगी लागू लागल्या.
आग का वाढली?
ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील भागात गेली जवळपास तीन वर्षे दुष्काळ असल्याने या भागांमधील जंगले, कुरणांमध्ये सुकलेला पालापाचोळा प्रचंड मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळेच हा वणवा पसरत गेला आणि त्याने भीषण रुप धारण केलं.
प्रमुख नेत्यानेच केलं दूर्लक्ष…
आगी किंवा वणवे हाताबाहेर जाऊ लागल्याचा इशारा अनेक माजी अग्निशमन प्रमुखांनी, तज्ज्ञांनी सरकारला दिला होता. अनेकदा इशारा देऊनही ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी याकडे दूर्लक्ष केलं. विशाल भूभागावर वणवा पसरल्यानंतर आणि दोन अग्निशमन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर लोकक्षोभास्तव मॉरिसन हवाई बेटांवरील सुट्टीवरुन मायदेशी परतले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच- हवामान बदल हा पर्यावरणवाद्यांनी व विरोधकांनी निष्कारण उभा केलेला बागुलबुवा आहे, असे मॉरिसन यांचे मत आहे. त्यामुळेच आता मॉरिसन यांच्याविरोधात स्थानिक संताप व्यक्त करत आहेत.