त्रास देणा-या एखाद्याला धडा शिकवायचा असेल तर पायतल्या चप्पलेचा चोप त्याला द्यायचा हे महिलांना चांगलेच ठाऊक आहे. एकदा का चप्पलेचा मार पडला की त्याची सारी अक्कल ठिकाण्यावर. नुसती चप्पल जरी दाखवली तरी पुरेसे. हाच फंडा एका ऑस्ट्रेलियन महिलेने वापरला आहे. पण आपल्या चप्पलेचा वापर तिने कोणा छेड काढणा-या पुरुषाला घाबरवण्यासाठी केला नाही तर चक्क मगरीला घाबरवण्यासाठी केला आहे. चप्पल दाखवून मगरीला धमकावतानाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
ऑस्ट्रेलियातल्या काकाडू पार्कमधील इस्ट एलिगेटर नदी ही मगरींसाठी प्रसिद्ध आहे. या नदीत मगरींची संख्या ही १०० हून अधिक आहे म्हणूनच तिला एलिगेटर रिव्हर या नावाने ओळखले जाते. या नदीच्या किना-यावर एक महिला आपल्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन उभी होती आणि अचानक एक मगर त्यांच्या दिशेने येत होती पण तरीही ही महिला अतिशय शांतपणे नदीच्या किना-यावर उभी होती. तिच्याजागी जर कोणी दुसरे असते तर मगरींना पाहताच आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला असता. पण ही महिला न घाबरता अतिशय शांतपणे तिथे उभी होती. मगर अतिशय जवळ आल्यानंतर तिने पायातली चप्पल काढली आणि काहीतरी ओरडून त्या मगरीला घाबरवण्याचा प्रयत्न करू लागली. हिच चप्पल तिने आपल्या हातावर आपटत आवाजही केला आणि पुढच्या सेंकदाला मगर मागे परतली. असे करताना तिच्यावर मगरीने हल्ला केला असता किंवा यात तिचा जीव देखील गेला पण जणू इथल्या मगरींच्या सवयीबद्दल तिला चांगलीच माहिती असल्यामुळे तिथे असे केले असल्याचे दिसते.