घरातील परिस्थितीमुळे ती अगदी लहानवयापासूनच वेश्या व्यवसायात आहे. जन्मदात्या आईवडिलांनीच तिला हे काम कऱण्यास भाग पाडले. लग्न झाल्यावर परिस्थिती बदलेल असे तिला वाटले. मात्र आहे तेच कमी म्हणून की का लग्नानंतरही तिचा त्रास कायम राहिला. वडिलांप्रमाणेच नवऱ्याकडूनही तिचा छळ सुरुच राहिला. इतकेच नाही तर या त्रासाचे चटके तिच्या मुलांनाही बसत होते. नवऱ्याकडून मिळणारा मार आणि होणारा छळ यांना वैतागून तिने एक दिवस घर सोडण्याचा निर्णय घेतला. आज ती स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करत आहे. तिची ही कहाणी अनेकांना प्रेऱणा देणारीच आहे.
तिचा परिस्थितीशी सुरु असलेला संघर्ष वाटतो तितका सोपा नाही. तिने एका स्वयंसेवी संस्थेमध्ये नावनोंदणी केली असून त्यांच्या मदतीने ती शिवणकामाचे प्रशिक्षण घेत आहे. या स्वयंसेवी संस्थेमध्ये आल्यापासून आपल्या आयुष्यात खूप बदल झाल्याचे ती सांगते. सुरुवातीला मी कोणावर ना कोणावर अवलंबून होते. मात्र आता मी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जायचे असे मी ठरवले असल्याचे ती सांगते. तिच्या मुलांची काळजी याच स्वयंसेवी संस्थेकडून घेतली जात असून त्यांचा सगळा खर्च संस्थेकडून केला जात आहे. टेलर कसे व्हायचे हे मी शिकत असून एक दिवस मला उत्तम डिजायनरही व्हायचे असल्याचे ती म्हणते. एक दिवस असा येईल जेव्हा माझ्या हाताखाली माझ्याप्रमाणेच रेडलाईट एरियामध्ये अडकलेल्या महिलांना मी नोकरी देऊ शकेन.
ह्यूमन्स ऑफ बॉम्बे या फेसबुक पेजने तिची ही कहाणी समोर आणली असून वाचकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. ही पोस्ट अनेकांकडून शेअर कऱण्यात आली असून त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाईक्सही मिळाले आहेत. त्यामुळे अतिशय कठीण परिस्थितीत लढा देणाऱ्या या महिलेची गोष्ट महिलांना खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारी आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता उभे राहणाऱ्या या स्त्रीशक्तीला सलाम.